Wednesday, July 3, 2024

आनंदाची बातमी! राज ठाकरे यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य, राज्यात चित्रीकरणाला तत्वत: परवानगी

देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. याचा सर्वाधिक फटका हा मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. सध्याची परिस्थिती पाहता लागलेल्या लॉकडाऊनमुळे कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे गुरुवारी (२० मे) या क्षेत्रातील अनेक मोठ्या दिग्गज कलाकार मंडळींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती. यानंतर राज यांनी लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी म्हटले की, मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर भरपूर समस्य आहेत, पण राज्यात चित्रीकरणाचे पुनरागमन होणे हेही महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचे चित्रीकरण तर राज्याबाहेर सुरू आहे. त्यानंतर मालिका निर्माते आणि चॅनेलचे मुख्य यांनी लादलेले निर्बंध पाळून चित्रीकरण कशाप्रकारे करणार, याचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी परवानगी देता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती राज यांनी दिली आहे. यावेळी बायो बबल कसा असेल, कलाकार आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांची संख्या किती असेल, शासनाने सांगितलेल्या नियमांची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार, चित्रीकरण करण्याची जागा कोणती असेल, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या राहण्याची कोणती व्यवस्था असेल यांसारख्या सर्व गोष्टींचा समावेश असलेला प्रस्ताव प्रत्येक निर्मात्याने मनसे चित्रपट सेनेकडे दिला, तर त्यापुढच्या परवानगीसाठी कार्यवाही केली जाईल, असे राज यांनी सांगितले.

शुक्रवारी (२१ मे) झालेल्या झूम मीटिंगमध्ये निर्माते आणि टीव्ही चॅनेलच्या प्रमुखांशी राज ठाकरेंनी चर्चा केली. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या या मुद्द्यावर राज यांनी उपाय शोधल्याने मीटिंगमधील मंडळींनी राज यांचे आणि मनसेच्या प्रयत्नांचे आभार मानले आहेत.

या शहरात चित्रीकरणासाठीच्या परवानगीची शक्यता
आताची परिस्थिती पाहता मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकच्या जवळच्या परिसरात चित्रीकरणासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोरोना व्हायरसची परिस्थिती खूपच बिकट आहे. अशामध्ये तिथे चित्रीकरणाची परवानगी मिळणे फार कठीण असल्याचेही राज ठाकरे यांनी या बैठकीदरम्यान सांगितले.

एक दिवसआधी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळींची विनंती
मराठी कलाविश्वासमोर कोरोनादरम्यान निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा राज ठाकरे यांनी गुरुवारी (२० मे) घेतला होता. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, ट्वीव्ही मालिका आणि संगीत क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या मंडळींशी राज ठाकरे यांनी झूम मीटिंगमधून संवाद साधला. यावेळी मंडळींनी महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यातील कलाकारांसाठी पॅकेज, बॅकस्टेज कामगारांना अनुदान आणि त्यांच्या लसीकरणासाठीची व्यवस्था केली जावी, यांसारख्या मागण्या मांडल्या.

कोणकोण होतं सहभागी?
झूम मीटिंगमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, मनसे नेते अमित ठाकरे, स्टार प्रवाह चॅनेलचे मुख्य- दिग्दर्शक सतीश राजवाडे, निर्माते- दिग्दर्शक महेश कोठारे, निर्माते- दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते आणि अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेता- दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री, अभिनेता- दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेता सचित पाटील आणि संगीतकार राहुल रानडे हे सर्व मंडळी उपस्थित होते

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

हे देखील वाचा