Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड रेस्टॉरंटमध्ये लोकांना २० वर्षे ऐकवली रफी साहेबांची गाणी; पुढे जाऊन अजीज यांनी स्वत:च गायली तब्बल २० हजार गाणी

रेस्टॉरंटमध्ये लोकांना २० वर्षे ऐकवली रफी साहेबांची गाणी; पुढे जाऊन अजीज यांनी स्वत:च गायली तब्बल २० हजार गाणी

संगीत हे आपल्या सर्वांसाठीच अतिशय आवश्यक आहे. निराशा, तणाव दूर करण्यासाठी अनेक डॉक्टर देखील म्युझिक थेरपीचा उपाय सांगतात. आपल्या देशात संगीत क्षेत्रात आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत. अगदी लता मंगेशकर, मोहम्मद रफींपासून ते अगदी आताच्या श्रेया घोषालपर्यंत सर्वच गायकांनी त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने रसिकांचे भरपूर मनोरंजन केले. याच गायकांमधील ८०/९० च्या दशकातील एक प्रमुख गायक म्हणजे मोहम्मद अजीज. शुक्रवारी (२ जून) गायक मोहम्मद अजीज यांचा वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्या गायकीच्या प्रवासाबद्दल…

मोहम्मद अजीज यांचा जन्म २ जुलै, १९५४ रोजी कोलकातामध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अजीज उल नबी होते. अजीज यांना लहानपणापासूनच गाण्यामध्ये आवड होती. अजीज मोहम्मद रफी यांचे सर्वात मोठे समर्थक होते. जेव्हा जेव्हा रेडिओवर रफी साहेबांचे गाणे लागायचे, तेव्हा अजीज अतिशय लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने ते गाणे ऐकायचे आणि गुणगुणायचे देखील. जेव्हा अजीज यांनी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा त्यांना रफी यांचे उत्तराधिकारी म्हणूनच ओळखले जायचे. रफी साहेबांनी जसे त्यांचे संपूर्ण जीवन गायनाला समर्पित केले, तसेच अजीज यांनी देखील स्वतःला गायनाला समर्पित केले.

अजीज रफी साहेबाना त्यांचे गुरु मानायचे. अजीज कोलकातामधील गालिब रेस्टॉरंटमध्ये लोकांना रफी साहेबांचे गाणे ऐकवायचे. तिथे येणारे लोक अजीज यांचे गाणे ऐकून टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक तर करायचेच, सोबतच त्यांना बक्षीस देखील द्यायचे. पुढे हेच काम ते त्यांचे घर चालवण्यासाठी करू लागले. जवळपास २० वर्ष अजीज यांनी हे काम केले. या रेस्टॉरंटमध्ये अनेक चित्रपटांचे निर्माता आणि दिग्दर्शक जेवायला यायचे. एकदा बंगाली निर्माता तिथे असताना त्यांना अजीज यांचा आवाज खूपच आवडला आणि त्यांनी अजीज यांना त्यांच्या सिनेमात गाण्याची संधी दिली. इथूनच्या त्यांच्या करिअरची सुरुवात झाली.

पुढे मोहम्मद अजीज यांनी गायनाचे प्रशिक्षण घेतले. १९८४ साली त्यांनी बंगाली सिनेमा ‘ज्योती’मध्ये पहिल्यांदा गाणे गायले. हे गाणे चांगले झाले आणि अजीज यांचे करिअर देखील सुरू झाले. पुढे काही काळाने अजीज मुंबईमध्ये चित्रपटांमध्ये गाण्याच्या दृष्टीने आले. येथे गाण्यासाठी प्रयत्न करत असतानाच त्यांना १९८५ साली पहिल्यांदा ‘अंबर’ या हिंदी सिनेमात गाण्याची संधी मिळाली. मुंबईत आल्यानंतर अजीज यांची भेट अनु मलिक यांच्याशी झाली. त्यावेळी अनु मलिक देखील संघर्ष करत होते. अशातच अनु मलिक यांना १९८५ साली मोठा ब्रेक मिळाला आणि त्यांनी अजीज यांना देखील त्यांच्या ‘मर्द’ सिनेमात ‘मर्द टांगेवाला’ गाणे गाण्याची संधी दिली. हे गाणे सुपरहिट झाले आणि अजीज यांचा सिक्का हिंदी सिनेमात चालला. या गाण्याने त्यांना इंडस्ट्रीमध्ये एक नवीन आणि मोठी ओळख मिळवून दिली.

पुढच्या काळात अजीज यांनी गोविंदा, ऋषी कपूर, सनी देओल, अनिल कपूर यांसारख्या मोठमोठ्या अभिनेत्यांसाठी गाणी गायली. शिवाय त्यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांसारख्या गायिकांसोबत देखील गाणी गायली.

मोहम्मद अजीज यांनी त्यांच्या संगीत कारकिर्दीत वीस हजारांपेक्षा अधिक गाणी गायली. ज्यात हिंदी, बंगाली, उडिया आदी भाषांमधील गाण्यांचा समावेश आहे. अजीज यांच्या गाण्यांमध्ये ‘आप के आ जा ने से’, ‘इमली का बूटा बेरी का पेड’, ‘दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए’, ‘मेरे दो अनमोल रतन’, ‘माई नेम इज लखन’, ‘तुझे रब ने बनाया होगा’ आदी अनेक हिट गाण्यांचा समावेश आहे. यासोबतच त्यांनी अनेक सुफी गाणे देखील गायले. एवढी मोठी कारकीर्द आणि महान गायक असूनही त्यांना कोणत्याही पुरस्काराने कधीच सन्मानित करण्यात आले नाही.

मोहम्मद अजीज यांना संगीताच्या दुनियेत प्रेमाने मुन्ना म्हणून संबोधले जायचे. अजीज नेहमी रफी साहेबांचे गाणे रेडिओवर मन लावून ऐकायचे. हे गाणे ऐकताना ते एकदम मर्फी रेडिओवर असलेल्या लहान मुलासारखे निरागस वाटायचे. त्यामुळेच त्यांना प्रेमाने मुन्ना म्हटले जाऊ लागले होते.

मोहम्मद अजीज यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मात्र, आज ते त्यांच्या गाण्यांमुळे अजूनही चाहत्यांच्या आठवणीत सदैव आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा