बॉलीवूड आणि टीव्ही विश्वात अशा अनेक अभिनेत्री झाल्या आहेत, ज्यांनी अभिनयाला रामराम ठोकत आयुष्याची नवी वाट निवडली. त्यातच आता ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत कीर्तीची भूमिका साकारणारी माजी टीव्ही अभिनेत्री आणि प्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी मोहिना सिंह हिचे नावही चर्चेत आले आहे.
मोहिना सिंहने(Mohena Singh) 2019 मध्ये आध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांचे पुत्र सुयश रावत यांच्याशी विवाह केल्यानंतर अभिनयापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ व्यतिरिक्त तिने ‘प्यार तूने क्या किया’, ‘कुबूल है’, ‘नया अकबर बीरबल’ आणि ‘सिलसिला प्यार का’ अशा मालिकांमध्ये अभिनयाची छाप सोडली. तसेच ‘डान्स इंडिया डान्स’मधून तिने आपल्या नृत्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मात्र लग्नानंतर तिने ग्लॅमर विश्वापासून अंतर ठेवत संपूर्ण लक्ष कुटुंबावर केंद्रित केले.
दरम्यान, मोहिना सिंहचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोहिना आध्यात्मिक प्रवचन देताना दिसत आहे. ती लोकांना मानवता, चांगले-वाईट कर्म आणि साधे जीवन जगण्याचा संदेश देताना पाहायला मिळते. चुकीच्या मार्गाने कमावलेल्या पैशांपासून दूर राहण्याचा सल्लाही ती देताना दिसते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक युजर्सच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, मोहिनाने खरंच आध्यात्माची वाट धरली आहे का?
व्हायरल व्हिडिओमध्ये मोहिना चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या कमाईवर भाष्य करताना म्हणते,
“वाईट कर्म करून, चुकीच्या मार्गाने पैसे कमावून आपल्या मुलांना वाढवणं योग्य आहे का? दुसऱ्यांना तुडवून यश मिळवणं बरोबर आहे का? आपण ठरवलं की बेईमानीची कमाई करायची नाही, तर नाहीच. पण आपण सतत मुलांसाठी कारणं देत राहतो. आपल्या आजी-आजोबांनीही साधं, प्रामाणिक आयुष्य जगलं होतं. मातीची घरं, चुलीवरचं जेवण… तरीही ते सुखी होते.”
https://www.instagram.com/reel/DTptUjvESYP/?igsh=MWs4aXhhanBhZWpwZw==
मोहिनाच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्स तिच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत, तर काहीजण तिच्या विचारांना पाठिंबा देत आहेत. काहींचं म्हणणं आहे की, या व्हिडिओच्या माध्यमातून मोहिना अप्रत्यक्षपणे ग्लॅमर वर्ल्डवर टीका करत आहे. एका युजरने कमेंट करत विचारलं, “ही आध्यात्मिक गुरू कधीपासून बनली?” तर दुसऱ्याने लिहिलं, “मोहिनाला काय झालं? ही तर अभिनेत्री होती ना?” तर आणखी एका युजरने तिच्या विचारांचं समर्थन करत, “अगदी योग्य बोलते आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर धोखाधडीचा आरोप, पोलिसांत तक्रार; संपूर्ण प्रकरण काय आहे? घ्या जाणुन










