Friday, July 5, 2024

अवधूत गुप्तेच्या घरात माकडांचा शिरकाव, “माकडचेष्टा” सांगत शेअर केला व्हिडिओ

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, संगीतकार, दिग्दर्शक असणारा अवधूत गुप्ते नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या त्याचा खुपते तिथे गुप्ते हा शो खूपच गाजत आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक सेलिब्रिटींकडून तो त्याच्या मनातील भावनांना व्यक्त करून घेताना दिसत आहे. अगदी राजकारणी लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच या शोमध्ये दिसत आहे. शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना खुपणाऱ्या असंख्य बाबींबद्दल जाणून घेणाऱ्या अवधूतने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने त्याला खुपणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितले आहे.

झाले असे की, बोरिवली नॅशनल पार्कजवळ राहणाऱ्या अवधूतच्या घरात अचानक एक माकड शिरले. याचा एक व्हिडिओ त्याने शेअर केला असून, सोबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे. अवधूतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक माकड त्याच्या घरात घुसून चक्क केळी खाताना दिसत आहे.

अवधूतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते?
तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक “माकड चेष्टा” खुपते!!

व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा!) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा!

हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, ह्याची मला खात्री आहे.

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा कोरोना पश्चात कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! .. आणि ह्याचं खरं कारण म्हणजे “त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी ह्याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्!”

ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात.

माकडं यायची. कोरोना आधी सुद्धा यायची. पण, महिन्या-दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी. करोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात!

बाकी स्ट्रगल चालूच राहील..

फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते.. शुभ दिवस!”

या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनी पोस्ट केली आहे. अनेकांनी आपण त्यांच्या जागेत राहत असल्यामुळे असे होत असल्याचे सांगितले आहे, तर काहींनी वन खात्याला सांगा असा सल्ला दिला आहे. एकूणच काय तर अवधूतची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली असून, व्हिडिओ देखील खूपच चर्चेत आला आहे.

हे देखील वाचा