कोणी केली हत्या तर कोणी लुटली बँक! चित्रपट पाहून प्रेरित झालेलं कुणी बनलं चोर तर कुणी दरोडेखोर


बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांवर असा आरोप आहे, की त्यांना पाहून गुन्हेगारांना गुन्हे करण्याचे नवीन मार्ग मिळतात. कधीकधी असे आरोप करणे योग्य ठरते. पोलिसांनी अशी अनेक प्रकरणे सोडविली आहेत, ज्यात आरोपींना चित्रपट पाहून गुन्हे करण्यासाठी नवीन मार्ग सापडले. तसेच, या मालिका चित्रपटांतून प्रेरणाही मिळाली होती.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘दृश्यम’ चित्रपट पाहून 13 वर्षाच्या मुलाने हत्येचा कट रचला. पुणे पोलिसांना 11 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. तपासात समोर आले की, आरोपी मुलाने खुनाची घटना अत्यंत लबाडीने घडवून आणली होती. हे अजय देवगणच्या प्रसिद्ध थ्रिलर फिल्म ‘दृश्यम’ सारखेच आहे असे वाटत होते.

अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटापासून प्रेरित होऊन, जगजित नावाच्या व्यक्तीने आणि त्याच्या साथीदाराने मिळून खून, चोरी, दरोडा यासारखे गुन्हे केले आहेत. त्यांना पकडल्यानंतर दोघांनीही चित्रपट पाहून गुन्हे करत असल्याचे सांगितले होते.

बँक चोरीवर आधारित ‘धूम’ या चित्रपटाने अनेक चोरांना गुन्हे करण्यास उद्युक्त केले. केरळमध्ये चोरांच्या टोळीने बोगदा खोदून बँक ऑफ केरळमधून तब्बल 80 किलोग्रॅम सोने आणि 5.5 लाख रुपयांची चोरी केली. जेव्हा गुन्हेगार पकडले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की ते ‘धूम’ पाहून गुन्हा करायचे.

‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’ पाहून एक तरुण इतका प्रभावित झाला की त्याने गुन्हेगारीच्या दुनियेत नाव कमावण्याचे स्वप्न पहायला सुरुवात केली. ही घटना बिहारची आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की, ‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटात चित्रित केलेल्या गुंडाच्या आयुष्यापासून प्रेरित होऊन तो गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. लोकांकडून खंडणी घ्यायचीही त्याची स्वप्न होती.

‘ओय लकी! लकी ओय’ या चित्रपटाचा प्रभाव असलेला एक व्यक्ती एका रात्रीत तीन ते चार गाड्या चोरी करायचा. एका वर्षाच्या आतच त्याच्या टीमने 180 कार चोरी केल्या. मात्र, नंतर पोलिसांनी त्यांना पकडले.

साल 2016 मध्ये शाहरुख खानच्या चित्रपटाद्वारे प्रभावित असलेल्या एका व्यक्तीने दीप्ती सरना नावाच्या मुलीचे अपहरण केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगाराने प्रथम दीप्तीला मेट्रोमध्ये पाहिले आणि तिचा पाठलाग सुरू केला. ज्या प्रकारे, शाहरुखने ‘डर’ चित्रपटात जूही चावलाचा पाठलाग केला होता.

काही वर्षांपूर्वी पोलिसांनी ‘स्पेशल -26’ हा चित्रपट पाहून गुन्हा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. हे लोक आयकर अधिकारी बनून, श्रीमंत लोकांच्या घरावर छापे टाकत असत. पोलिसांनी त्यांना पकडले असता त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये जप्त करण्यात आले.


Leave A Reply

Your email address will not be published.