कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागच्या वर्षी आलेल्या या विषाणूने आता पुन्हा एकदा तोंडवर काढले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूदर देखील वाढला आहे. दिवसागणिक मृतांचा आकडा वाढत आहे. अशातच या विषाणूने बॉलिवूडमधील दिग्गज संगीतकार नदीम श्रवण या लोकप्रिय जोडीतील श्रवण राठोड यांचा बळी घेतला आहे.
22 एप्रिल 2021 ( गुरुवार) सकाळी 8 वाजता श्रवण राठोड यांनी मुंबई मधील रहेजा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार,श्रवण हे मृत्यूच्या जवळपास 48 तास आधीपासून व्हेंटिलेटरवर होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर उपचाराला श्रवण यांचा प्रतिसाद न मिळाल्याने मात्र डॉक्टरांचेही प्रयत्न अखेर थांबले. तसेच त्यांना आधी पासूनच अनेक शारीरिक व्याधी असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. श्रवण यांना 17 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते , तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्यावर डायलिसिसची प्रक्रिया देखील करण्यात आली होती.
दिग्गज संगीतकार श्रवण आणि त्यांची पत्नी विमलादेवी हे दोघेही कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. अशी माहिती त्यांच्या परिवाराकडून आली आहे. कुंभमेळ्यातून परत आल्यानंतर त्यांची तब्बेत खालावली. त्यांनी कोरोना चाचणी केली, तेव्हा त्यांचा अहवाल पॉसिटीव्ह आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
श्रवण राठोड यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा संजीव राठोड याने इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना सांगितले की, “आमच्या आयुष्यात एवढी वाईट वेळ येईल,याचा आम्ही विचार देखील केला नव्हता. माझ्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले आहे. मी आणि माझी आई देखील कोरोना बाधित आहोत. तसेच माझ्या भावाला देखील कोरोना झाला आहे. तो सध्या होम क्वारंटाइन आहे.”
पुढे त्याने सांगितले की, “मी आणि माझी आई सध्या एकत्र रुग्णालयात आहोत. आमच्या दोघांची तब्बेत आता ठीक आहे. पण अश्या काही अफवा ऐकायला मिळाल्या आहेत की, बिलाच्या समस्येमुळे डॉक्टर आम्हाला वडिलांचा मृतदेह देत नाहीये, पण हे सगळं खोटं आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आम्हाला नेहमीच मदत केली आहे.”