माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नफिसा अली यांचा जन्म १८ जानेवारी १९५७ रोजी झाला होता. आज नफिसा आपला ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. नफिसा अली यांचा जीवन प्रवास खूप संघर्षमय राहिला आहे. पण त्यांनी आयुष्यातील प्रत्येक अडचणीचा धीरोदात्तपणे सामना केला. नफिसा या मुस्लिम कुटुंबातील होत्या. त्यांनी भारतीय सैन्यातील एका शीख सैनिकाशी लग्न केले होते. नफिसा यांच्यासाठी हे सारं खूप कठीण होतं पण त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर सारं काही मिळवलंच. एक काळ असा होता की नफीसा यांना त्यांच्या पतीच्या मित्रांच्या घरी नाईलाजास्तव राहावं लागलं होतं.
नफिसा अली आणि त्यांचे पती रवींदरसिंग सोढी एकमेकांवर खूप प्रेम करत होते. नफिसा मुस्लिम कुटुंबातील होत्या आणि रवींदर शीख कुटुंबातील होते. अशा परिस्थितीत कोणीही हे लग्न स्वीकारण्यास तयार नव्हतं. रविंदर यांच्या आईला ही बाब अजिबात पचनी पडली नव्हती की तिच्या मुलाने एका मुस्लिम मुलीशी लग्न केलं आहे आणि तेही हिरोईनबरोबर. पण रवींदर आणि नफिसा अली हे त्यांच्या प्रेमासाठी काहीही करण्यास तयार होते.
कुटुंबाची वागणूक पाहून दोघांनीही कोलकाता येथे नोंदणी पद्धतीने (रजिस्टर मॅरिज) विवाह केला. लग्न झालं खरं पण खरी अडचण इथूनच सुरु झाली. लग्नानंतर नफीसा यांना त्यांच्या सासूने स्वीकारले नाही. यामुळे नफिसा यांना काही काळ पती रविंदर यांच्या मित्रांच्या घरीच राहावं लागलं होतं. परंतु कालांतराने रविंदर यांचे मोठे मामा नफिसा यांच्याकडे आले आणि स्वतः सोबत घरी येण्याची विनवणी केली. इतकंच नाही तर घरच्या सुनेला असं परक्या घरी राहावं लागल्याबद्दल त्यांनी नफिसा अली यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती.
अशाप्रकारे, नफिसा अली यांचे वैवाहिक जीवन पुन्हा रुळावर आले. नफीसा आणि रविंदर यांचं विधिवत पुन्हा एकदा धुमधडाक्यात घरच्यांनी लग्न लावून दिलं. बऱ्याच वर्षांनंतर, जेव्हा नफीसा अली यांच्या सासूची तब्येत बिघडली आणि त्या अंथरुणावरच खिळल्या, त्यावेळी त्यांना फक्त आणि फक्त एकट्या नफीसा अली यांच्यासोबतच रहायचं होतं. आज नफिसा त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. नफिसा आपल्या कुटुंबासमवेत गोव्यात राहतात. त्यांना दोन मुली पिया, अरमान आणि एक मुलगा अजित सोढी अशी तीन मुले आहेत. नफिसा यांचा मुलगा अजितही बॉलिवूडमध्ये पदार्पणाची तयारी करत आहे.
नफिसा यांनी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चॅम्पियन बनल्यावर १९७६ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. यानंतर त्यांनी चित्रपटत क्षेत्रात प्रवेश केला. कालांतराने मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी फिल्म इंडस्ट्री सोडली. जवळपास १८ वर्षांनंतर त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये परतल्या परंतु सन २०१८ मध्ये नफीसा यांना कर्करोग झाला. ज्यानंतर आता चित्रपटांपासून पूर्णपणे दूर आहेत. सुखद बाब अशी की, कर्करोगाशी झालेली लढाईही त्यांनी जिंकली आहे.
नफिसा यांनी आजपर्यंत लाईफ इन अ मेट्रो, मेजर साब, बिग बी, यमला पगला दिवाना, आतंक, लाहोर, गुजारीश, बेवफा, क्षत्रिय, गॉडफादर, ख्वाब, ये जिंदगी का सफर या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साहेब बिवी और गँगस्टर ३ हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे.