Monday, July 1, 2024

अधुरी प्रेम कहाणी! नर्गिस दत्त यांच्या लग्नाची बातमी समजल्यानंतर राज कपूर स्वतःलाच देऊ लागले होते सिगारेटचे चटके

साठच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नर्गिस (nargis)यांना ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आणि तुफान लोकप्रियता मिळवली. नर्गिस यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने अनेक हिट सिनेमे दिले. नर्गिस यांनी खूप कमी कालावधीत या ग्लॅमर क्षेत्रात त्यांचे स्थान अढळ केले. त्यांच्या व्यासायिक आयुष्यासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरले. अशात आज म्हणजेच बुधवारी (दि. 3 मे)ला नर्गिस यांची पुण्यतिथी आहे. चला, तर मग यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्सा…

नर्गिस यांनी सुनील दत्त (sunil dutt) यांच्याशी 1958 साली लग्न केले. नर्गिस आणि सुनील दत्त यांची प्रेमकहाणी अगदी चित्रपटातील प्रेमकहाणी सारखीच स्वप्नवत अशी होती. नर्गिस यांच्या जीवनात दोन व्यक्ती आले एक राज कपूर आणि दुसरे सुनील दत्त. नर्गिस या त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या या दोन्ही व्यक्तीबद्दल समर्पित होत्या. नर्गिस आणि राज कपूर यांची प्रेमकहाणी मीडियासोबतच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खूपच गाजली.

नर्गिस आणि राज कपूर (raj kapoor) यांनी ‘आवारा’, ‘श्री 420’, ‘बरसात’ अशा एकूण 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. ही जोडी रील आणि रियल लाईफमध्ये तितकीच खास होती. राज कपूर आणि नर्गिस यांची पहिली भेट 1946 मध्ये झाली, तेव्हा नर्गिस यांना पाहताच राज कपूर त्यांच्या प्रेमात पडले. ‘आग’ सिनेमात नर्गिस यांना भूमिका मिळावी यासाठी राज कपूर इंदर राज आनंद यांच्या घरी गेले आणि त्यांना नर्गिस यांना काहीही करून ‘आग’ सिनेमात भूमिका द्यावी यासाठी आग्रह केला.

जस जसा काळ पुढे सरकत गेला तसतशी नर्गिस आणि राज कपूर यांची प्रेम कहाणी देखील पुढे जात होती. नर्गिस यांनी फक्त राज कपूर आणि आर. के सोबतच चित्रपट करण्यास सुरुवात केली. इतर मोठमोठ्या निर्माता दिग्दर्शकांना नर्गिस नकार द्यायच्या. काही कालावधीनंतर नर्गिस यांनी राज कपूर यांच्याकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र राज कपूर हे आधीपासूनच विवाहित होते आणि त्यांना मुलं देखील होती.

हे माहित असून देखील नर्गिस राज कपूर यांच्या प्रेमात वेड्या होत्या. लग्नाचा विषय पुढे सरकत नाही म्हटल्यावर नर्गिस यांना कळून चुकले की, राज कपूर हे कृष्णा राज कपूर यांना सोडू इच्छित नाहीत. त्यामुळे नर्गिस स्वतःच त्यांच्या आयुष्यातून बाहेर गेल्या.

पुढे नर्गिस यांनी इतर निर्माता दिग्दर्शकांसोबत काम करणे सुरु केले. पुढे त्यांच्या आयुष्यात सुनील दत्त यांची एन्ट्री झाली. तसे पहिले तर सुनील दत्त आणि नर्गिस यांची पहिली भेट जेव्हा सुनील दत्त सिलोन रेडिओमध्ये काम करायचे तेव्हा झाली. नर्गिस या रेडिओच्या स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी आल्या होत्या आणि सुनील दत्त यांना त्यांची मुलाखत घ्यायची होती. त्यावेळी नर्गिस खूप मोठ्या स्टार होत्या, त्यांना पाहून सुनील दत्त खूप नर्व्हस झाले होते. खरं ती मुलाखत सुनील दत्त यांना नर्गिस यांच्यासमोर काहीच बोलता न आल्याने रद्द करण्यात आली होती.

पुढे नर्गिस बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’ सिनेमाच्या सेटवर आल्या असताना तिथे देखील त्यांची सुनील दत्त यांची भेट झाली. सुनील दत्त यांना पाहून नर्गिस यांना रेडिओ ऑफिसमधला किस्सा आठवला असावा कारण त्या त्यांना पाहून हसून पुढे निघून गेल्या. त्यांची तिसरी भेट ही चांगली झाली. ‘मदर इंडिया’ सिनेमाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. या सिनेमात सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा प्रचंड चालला शिवाय ऑस्कर वारी देखील या सिनेमाला घडली.

या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान देखील सुनील दत्त खूप नर्व्हस असायचे, तेव्हा नर्गिस त्यांना खूप मदत करायच्या. त्यांच्या मदतीमुळेच सुनील दत्त अगदी सहजतेने अभिनय करू शकले. नर्गिस यांच्या अशा स्वभावामुळे सुनील दत्त यांच्या मनात नर्गिस यांच्याबद्दल एक आदर तयार झाला. या सिनेमाच्या सेटवर एक अशी घटना घडली ज्यांमुळे नर्गिस आणि सुनील दत्त यांच्यात प्रेमाचा अंकुर फुटला.

गुजरातच्या बिलिमोर गावात या सिनेमाचा सेट तयार करण्यात आला होता. चहूबाजूला कोरडे गवत आणि गवताच्या पेंड्या लावण्यात आल्या होत्या. एका सीनसाठी त्या गवताळ भागात आग लावली गेली. मात्र, ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली, आणि त्यात नर्गिस अडकल्या. त्यांना आगीत अडकलेले पाहून सुनील दत्त हे जीवाची पर्वा न करता त्या आगीत गेले आणि नर्गिस यांना सुखरूप बाहेर काढून घेऊन आले.

सुनील दत्त यादरम्यान गंभीर जखमी देखील झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले. नर्गिस रोज न चुकता हॉस्पिटलमध्ये जाऊन सुनील दत्त यांना भेटायच्या त्यांची काळजी घ्यायच्या. नर्गिस यांच्या मनात देखील सुनील दत्त यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले. पुढे काही काळाने सुनील दत्त यांनी नर्गिस यांना लग्नाची मागणी घातली आणि नर्गिस यांनी देखील ती मान्य केली. या दोघांनी 1958 साली गुपचूप लग्न केले, आणि 1959 मध्ये त्यांनी लग्न केल्याचे जाहीर केले.

नर्गिस यांच्या लग्नाची बातमी समजताच राज कपूर सैरभैर झाले. ते दारू पिऊन तासंतास बाथटबमध्ये बसून राहायचे. स्वतःला ते सिगरेटचे चटके देखील द्यायचे जेणेकरून हे स्वप्न वाटावे आणि ते त्या चटक्यांनी स्वप्नातून जागे व्हावे. राज कपूर नर्गिस यांच्या लग्नानंतर खूपच दारू प्यायला लागले होते.

बॉलिवूडमध्ये आपण असंख्य प्रेम कहाण्या जुळताना आणि तुटताना पहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण राज कपूर आणि नर्गिस याची प्रेमकहाणी या क्षेत्रातली सर्वात गाजलेली आणि अमर कहाणी आहे.(nargis dutt `death anniversary know nargis dutt sunil dutt lovestory )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

हेमा मालिनी यांनी लग्नाच्या 43व्या वाढदिवसानिमित्त दाखवली सेलिब्रेशनची झलक, अभिनेते धर्मेंद्र दिसले अनोख्या स्टाईलमध्ये

हे देखील वाचा