Wednesday, July 3, 2024

मराठी कलाकारांची किंमत कधी कळणार? अशोक मामांना दिलेल्या वागणुकीमुळे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमावर संतापले नेटकरी

मराठी टेलिव्हिजनवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. गेले अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, अशा एकापेक्षा एक दमदार कलाकारांची या कार्यक्रमात रंंगत पाहायला मिळते. त्यामुळेच या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. परंतु हा कार्यक्रम जितका चांगल्या गोष्टींसाठी गाजला तेवढाच तो वादाच्या भोवऱ्याही अडकलेला अनेकदा पाहायला मिळाला आहे. कधी कार्यक्रमांत झालेल्या विनोदावरुन तर कधी राजकारण्यांच्या नकलेवरुन या कार्यक्रमावर जोरदार टिका करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा मराठी सिने जगतातील दिग्गज अभिनेते यांना दुय्यम वागणूक दिल्याच्या चर्चेमुळे हा कार्यक्रम नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, चला हवा येऊ द्या कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात मराठी सिने जगतातील कलाकार तर प्रमोशनसाठी हजेरी लावतातच त्याचबरोबर हिंदी सिने जगतातीलही कलाकार आवर्जुन हजेरी लावताना दिसत असतात. सध्या अभिनेते अशोक सराफ यांनाही दुय्यम वागणुक दिल्याचा आरोप कार्यक्रमावर होत आहे. काही दिवसांपूर्वीच मराठी सिने जगतातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचनिमित्ताने चला हवा येऊ द्या कार्यक्रमामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पेशल कार्यक्रमासाठी अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर काही दिवसांनी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाची टीमही ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात आली होती. ज्यामध्ये अनिल कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन असे कलाकार दिसले होते.  यावेळी अभिनेता स्वप्निल जोशीने या कलाकारांना मान देत स्वतःची खुर्ची सोडून कलाकारांसोबत बसल्याचे दिसून आले होते. मात्र त्याआधी अभिनेते अशोक सराफ यांच्यावेळी मात्र हा मान दिला नसून त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप सोशल मीडियावरुन होताना दिसत आहे.

 

 

या दोन्ही फोटोंचे कोलाज करुन पोस्ट शेअर करत प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ज्यामध्ये मराठी कार्यक्रमांमध्येच मराठी कलाकारांना दुय्यम वागणूक दिला जात असल्याची टीका होताना दिसत आहे. त्याचबरोबर मराठी कलाकारांची किंमत आपण कधी करणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

हे देखील वाचा