Friday, March 29, 2024

मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी हक्काचं व्यासपीठ, द चॅनेल १ ओटीटी प्लॅटफॉर्म आलंय आपल्या भेटीला

मराठी मनोरंजनप्रेमींसाठी द चॅनेल १ नावाचा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु झाला आहे. यावर फक्त मराठी वेब सिरीज, मराठी एकांकिका आणि मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याचे उद्धाटन शुक्रवारी पुण्यात करण्यात आले.

‘द चॅनल १’ हे भारतातील पहिले मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ठरणार आहे, जे मराठी चित्रपट, वेब मालिका आणि मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमधील इतर गोष्टी आपल्या प्लॅटफॉर्मवर दाखवणार आहे. या माध्यमातून दिग्गज कलावंत आणि नवोदित कलावंतांसाठी एक हक्काच व्यासपीठ मिळणार आहे.

‘गेल्या काही वर्षांत ओटीटी उद्योगात खूप मोठी वाढ झाली आहे आणि आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही याकडे वळाले आहेत. नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणे निश्चितच एक आव्हानात्मक गोष्ट आहे, परंतु आमच्याकडे सर्वोत्कृष्ट टीम असून ती पूर्णपणे मराठी भाषा व मनोरंजन क्षेत्राशी संबंधित काम करतेय, असे ‘द चॅनल१’ चे सीईओ सार्थक पवार या उद्धाटन प्रसंगी म्हणाले.

‘आम्ही महाराष्ट्रातील जनतेला भेटून एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील लोकांना कोणत्या कथा आवडतात? त्यांना मोबाइलवर काय पाहायचं आहे? कोणत्या प्रकारच्या गोष्टी त्यांना पाहायच्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बर्‍याच लोकांना अशा कथा आवडतात, ज्या त्यांना स्वतःला जोडलेले वाटेल, त्यांना त्यांच्या दरम्यानच्या, भूमीशी जोडलेल्या कथा पहायला आवडतील, त्यांना त्या कथा पहायच्या आहेत ज्यामुळे त्यांना कनेक्ट झाल्यासारखे वाटू शकते’, असेही ते पुढे म्हणाले.

नाट्य, सिने, मालिकांचे दिग्दर्शक व चॅनलचे सीओओ प्रशांत गिरकर म्हणाले, ‘महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटींपेक्षा जास्त आहे, त्यातील मोठ्या प्रमाणावर मराठी बोलणारे लोकं आहेत. आमचा प्लॅटफॉर्म असा आहे जिथे फक्त मराठी एकांकिका, चित्रपट, लघुपट, माहितीपट आणि वेब मालिका आहेत. हे व्यासपीठ हजारो मराठी कलाकारांना त्यांच्या अभिनय क्षमता वाढवण्याची संधी देईल. हे व्यासपीठ तयार करण्यापूर्वी बरेच संशोधन केले गेले आहे, जेणेकरुन कंटाळवाणे होणार नाही.’

या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उद्धाटनप्रसंगी सिनेअभिनेते श्री. विक्रम गोखले, यतीन कार्येकर द चॅनल १ चे सल्लागार रमेश पवार, सीईओ श्री. सार्थक पवार, सीओओ दिग्दर्शक श्री. प्रशांत गिरकर, माननीय. श्री. सुनील माने, श्री. उज्जवल केसकर, सौ. लीना बाळासाहेब नांदगावकर, नगरसेवक किरण दगडे पाटील, ॲड. प्रसन्न दादा जगताप, प्राची ताई शहा, सौ. रुपाली पाटील ठोंबरे, श्री. रमेश परदेशी, अभिनेता मदन देवधर, विजय पटवर्धन, रोहित जाधव, चेतन चावडा,नीता दोंदे, पूनम शेंडे व विवध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

हे देखील वाचा