नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. नवरात्रीच्या या मंगलमय उत्सवात सर्वत्र आईचा जागर सुरु असतो. सरस्वती ही भारतीय संस्कृतीतील एक श्रेष्ठ देवता आहे. शारदा हे सरस्वतीचे रूप. ज्ञानाची अन् विद्येची देवता अशी ओळख असलेल्या तेजोमय रूपातील ‘शारदे’ची उपासना आगामी ‘फुलवंती’ या चित्रपटातील ‘हे शारदे’ या गाण्यातून पहायला मिळणार आहे.
वाहतो ह्या इथे ज्ञानरुपी झरा
प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा
विद्या असे जिथे लक्ष्मी वसे तिथे
देसी तू जना अखंड सुखसंपदा
असे बोल असणारं हे गाणे मनाला प्रसन्नतेची आणि ऊर्जेची अनुभूती देते. मंदार चोळकर लिखित हे गाणं राहुल देशपांडे यांनी स्वरबद्ध केले आहे. संगीतकार अविनाश विश्वजीत यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे.
देवीचे रूप भक्तांच्या मनामनात, अंतःकरणात कायम असते. तिच्याप्रती भावना गुंतलेल्या असतात. याच भावना ‘हे शारदे’ या गाण्याच्या वेळी आमच्या सर्वांच्या मनात होत्या, असं सांगत उर्जेची अनुभूती देणारा हे गाणं प्रत्येकाच्या मनात चैतन्य निर्माण करेल, असा विश्वास ‘फुलवंती’ चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला. या गाण्याच्या निमित्ताने खूप वर्षांनी मराठी चित्रपटामध्ये देवी शारदेवर गाणं आलंय.
शारदा अर्थात देवी सरस्वती; विद्येची देवी आहे. ती बुद्धिमत्ता, वाणीवर प्रभुत्व, शहाणपण आणि तर्कशास्त्र प्रदान करते. ज्ञानाच्या- बुद्धीच्या सामर्थ्याने आपण जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत शारदेची उपासना महत्त्वाची मानली जाते.
‘फुलवंती’ चित्रपट नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ यांच्यातील पैज व आव्हानावर चित्रपट बेतला आहे. कला व बुद्धिमत्तेतील युद्ध आपण यात पाहणार आहोत.
पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत… ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचेअसून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन,मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा