Wednesday, October 23, 2024
Home कॅलेंडर निळू फुलेंच्या जयंती दिनी खास पोस्ट करत ‘या’ अभिनेत्याने केली त्यांच्यावरील बायोपिकची घोषणा

निळू फुलेंच्या जयंती दिनी खास पोस्ट करत ‘या’ अभिनेत्याने केली त्यांच्यावरील बायोपिकची घोषणा

मराठी चित्रपट जगतात असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाने मराठी रंगमंचाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले. यामध्ये आवर्जुन नाव घेतले जाते ते म्हणजे दिवंगत अभिनेते निळू फुले यांचे. निळू फुले (Nilu Phule)  हे मराठी चित्रपट जगताला लाभलेले एक असामान्य व्यक्तिमत्व होते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपट जगतात अनेक सुपरहीट चित्रपट दिले. त्यांच्या या अस्सलखित कसदार अभिनयाची चर्चा आजही मराठी चित्रपट जगतात होत असते. आज ( ४ एप्रिल) निळू फुलेंची जयंती. याच निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

अभिनेते निळू फुले हे मराठी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी भूमिका केलेले चित्रपट आजही मराठी रसिकांना भुरळ घालत असतात. त्यांचा अस्सल रांगडा अभिनय, बोलीभाषेवरील प्रभुत्व आणि करारी डोळे यांमुळे त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत होती. आज ४ एप्रिलला अभिनेते निळू फुले यांची जयंती. याच निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने खास शब्दात  त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. निळू फुलेंना शुभेच्छा देतानाच प्रसाद ओकने त्याच्या नव्या चित्रपटाची माहितीही दिली आहे जो निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.

या पोस्टमध्ये  “निळूभाऊ, आज तुमचा वाढदिवस. तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं, अनुभवता आलं, तुमच्याकडून बरंच काही शिकलो. तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन “गुरु” च मानलं., तुमचा आशीर्वाद म्हणूनच की काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली “गुरुदक्षिणा” असेल. फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ.”  असे म्हणत निळू फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान अभिनेते  निळू फुले यांनी अभिनय कारकिर्दीत जास्तीत जास्त खलनायकाच्या भूमिका साकारल्या मात्र त्यांच्या या खलनायकी भूमिकाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या हे त्यांच्या अभिनयाचे यश होते. त्यांचा ‘बाई वाड्यावर’ हा संवाद असो किंवा ‘आररररा’ म्हणत मारलेली डरकाळी असो त्यांची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या काळजावर कोरली होती. निळू फुले यांचा जन्म ४ एप्रिल १९३० रोजी पुण्यात झाला. लहानपणापासुनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून मराठी चित्रपट जगतात पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा