Thursday, March 28, 2024

The Kashmir Files | नितीन गडकरींची चित्रपटावर प्रतिक्रिया; म्हणाले, ‘सत्य लपविण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण…’

सध्या देशभरात विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता प्रदर्शनानंतरही या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड तर तयार केलेच आहेत, सोबतच चित्रपटाने राजकीय मैदानातही वातावरण गरम केले आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले होते. तर काही राज्यांनी या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चित्रपटावर सडकून टीका केली होती. त्यामुळे शरद पवार आणि विवेक अग्निहोत्री वाद चांगलाच रंगला होता. आता पहिल्यांदाच भाजप नेते नितीन गडकरी यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्याने, पुन्हा एकदा ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपट चर्चेत आला आहे.

दिल्लीच्या आंतराष्ट्रीय सेंटरमध्ये या चित्रपटातील कलाकारांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जेष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांच्यासोबत अनुपम खेर (Anupam Kher), विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी (Pallavi Joshi) उपस्थित होते. कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांना नितीन गडकरी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी आपले चित्रपटाबद्दलचे मत व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले की, “काश्मिरी पंडितांचा छळ करण्यात आला आणि त्यांना काश्मीरमधून बाहेर जाण्यास भाग पाडले गेले हे खरे आहे. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांची दुर्दशा आणि त्यांची दयनीय अवस्था सर्वांसमोर अचूकपणे मांडली आहे. मी याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. काश्मिरी पंडितांचा खरा इतिहास लोकांना माहीत नव्हता आणि हे सत्य लपविण्याचे अनेक प्रयत्न झाले होते.” याबद्दल बोलताना नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “विवेक अग्निहोत्री यांनी ज्या पद्धतीने चित्रपट दिग्दर्शित केला आहे, त्याद्वारे त्यांनी काश्मीरची सत्यकथा लोकांसमोर मांडली आहे. हा चित्रपट दीर्घकाळ स्मरणात राहील. ‘द काश्मीर फाइल्स’ नवीन पिढीला काश्मिरी पंडितांच्या इतिहासाची ओळख करून देईल. त्याबद्दल मी विवेक अग्निहोत्री यांचे आभार मानतो. काही सेक्युलर लोक चित्रपटात रस घेत नाहीत.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

नितीन गडकरी यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादावर चित्रपटाचे अभिनेते अनुपम खेर म्हणाले, “आतापर्यंत जे सत्य लोकांपासून लपवले जात होते ते आता समोर आले आहे. या चित्रपटात मी खूप मनापासून अभिनय केला आहे. सध्याच्या सरकारने काश्मिरी पंडितांसाठी सर्वात जास्त काम केले आहे. या सरकारनेच काश्मीरमधून कलम ३७० हटवले.”

या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, “माझा चित्रपट कोणाचाही प्रचार किंवा टीका करत नाही. आमचा उद्देश कोणावरही टीका करणे हा कधीच नव्हता. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की ‘द काश्मीर फाइल्स’ कोणतीही प्रसिद्धी करत नाही. काही लोक आमच्या आणि चित्रपटाविरोधात खोट्या कथा पसरवत आहेत.”

दरम्यान द काश्मिर फाइल्स हा चित्रपट १९९० च्या काळात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्याय अत्याचारावर आधारित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा