दिलबर गर्ल नोरा फतेही तिच्या डान्स प्रमाणेच ग्लॅमरस लूकसाठी सुद्धा ओळखली जाते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडिओ आणि ब्युटीफुल फोटोजमुळे नेहमी चर्चेत असते. नोराचा जबरदस्त डान्स पाहून भले भले लोकही तिच्या डान्स मूव्हजवर आणि तिच्या अदांवर जीव ओवाळून टाकतात. मूळची कॅनडाची असणाऱ्या नोराने खूपच कमी वेळात तिच्या डान्सने भारतीयांना तिचे दिवाने केले. पंजाबी आई आणि मोरोक्कोच्या वडिलांची कन्या असणाऱ्या नोराने कडक आयटम नंबर्स करत बॉलिवूडमध्ये स्थान पक्के केले आहे.
नोराने नुकताच दुबईचा प्रसिद्ध यूटुबर असणाऱ्या अनस बुखाशला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान नोराने तिच्या संघर्षाच्या काळाला उजाळा देत मनसोक्त संवाद साधला. हे सर्व सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू देखील आले. अनेक स्वप्न घेऊन ती भारतात आली. मात्र इथे आल्यावर तिच्यासोबत अनेक वाईट घटना घडल्या, ज्याचा तिने विचार देखील केला नव्हता.
यावेळी ती म्हणाली, ” मी भारतात आली तेव्हा मला वाटले, की मला लिमोजीन गाडीमधून नेले जाईल, शानदार हॉटेलच्या एका सुटमधे मला थांबवले जाईल, आणि मी ऐटीत ऑडिशनला जाईल. माझा हा विचार माझ्याच चेहऱ्यावर जोरदार चापट होती. अनेक नकार, टिंगल आदी अनेक गोष्टींमुळे मी माझा आत्मविश्वास गमवायला लागली होती.”
पुढे तिने सांगितले की, ” मी मुंबईत ८/९ मुलींसोबत एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्या सर्व मुली खूपच लबाड होत्या. माझा पासपोर्ट देखील चोरीला गेला. एवढे सर्व होऊनही मला पुन्हा परत जायचे नव्हते. मला भारतात येण्याआधी कोणीतरी सांगायला पाहिजे होते की, तूला तिथे वाईट लोकं मिळतील, जे तुला त्रास देतील, तुझ्यावर हसतील, तुला परत येण्याचा सल्ला देतील, तुझे मानसिक खच्चीकरण करतील, तू एका विकसित देशातून विकसनशील देशात कशी काय जाऊ शकते? असे विचारतील. मात्र असे काही नाही झाले. ”
तिच्यासोबत भाषेवरून घडलेला किस्सा सांगताना ती म्हणाली, ” मी एका कास्टिंग डायरेक्टरला भेटायला गेली, त्याला माहित होते की, मला हिंदी येत नाही. तिथे गेल्यावर त्याने मला मुद्दाम हिंदी संवाद दिले, आणि माझ्या उच्चारांवर जोरात हसायला लागला. तेव्हा मला खूप राग आला होता. हसायचे होते तर मी तिथून निघून जाण्याची तरी वाट पाहायची. पण तो माझ्यासमोरच माझ्यावर हसत होता.”
अनेक नकार ऐकत, अनेक अपमान पचवत अखेर नोराने २०१४ साली आलेल्या ‘रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरबन’ सिनेमातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. मात्र तिचे हे पदार्पण यशस्वी झाले नाही. तिने अनेक साऊथ सिनेमांमध्ये देखील काम केले. ‘बाहुबली : द बिगनिंग’ चित्रपटात तिने ‘मनोहारी’ गाण्यावर डान्स केला होता. तिला खरी ओळख मिळाली ती बिग बॉस या शोमुळे, आणि दिलबर या गाण्यातून तर तिने प्रेक्षकांना तिची दखल घ्यायलाच लावली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज नोरा सर्वांच्याच ओळखीचा चेहरा बनली आहे. एवढेच नाही तर यावर्षी नोराला ‘परफॉर्मर ऑफ द इयर’ हा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
नोरा लवकरच अजय देवगनसोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात दिसणार आहे.










