सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं वार्धक्यामुळे ठाण्यातल्या त्यांच्या राहत्या घरीच निधन झालं आहे. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली असून सिनेसृष्टीचं फार मोठं नुकसान झाल्याचं माध्यमात बोललं जातंय. रवी पटवर्धन यांची कलाक्षेत्रातील ५० वर्षांची भलीमोठी कारकीर्द ठरली.
१९४४ साली अवघ्या सहा वर्षांचे असताना त्यांनी एका नाटय महोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. त्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष स्वतः बालगंधर्व होते.
अशी ही त्यांची वाटचाल पुढे सुरूच राहिली. ८०च्या दशकात त्यांनी ‘इजा बीजा तिजा’, ‘राजा नं वाजवला बाजा’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘उंबरठा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘अंकुश’, ‘तेजाब’ यासारख्या २००हुन अधिक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तसेच तुझं आहे तुजपाशी, एकच प्याला, आरण्याक, आनंद, तुघलक, बोफेट, तुफानाला घर हवंय या आणि इतर अनेक नाटकांचे त्यांनी महाराष्ट्रभर हजारो प्रयोग केले होते. त्यांची वाखाणण्यासारखी बाब म्हणजे जे नाटक त्यांनी ८० च्या दशकात केलं होतं तेच आरण्याक नाटक त्यांनी पुन्हा वयाच्या ८२ व्या वर्षी पुन्हा केलं. यासाठी त्यांना संपूर्ण कलाक्षेत्रातून वाहवा मिळाली.
याशिवाय त्यांनी मालिकक्षेत्रात देखील यशस्वीपणे काम केलं. नुकतीच सुरू असलेली अगबाई सासूबाई, आमची माती आमची माणसं या मराठी तर तेरा पन्ने, महाश्वेता या हिंदी मालिकांमध्ये देखील ते झळकले होते. सध्या सुरू असलेल्या अगबाई सासूबाई मालिकेतील सोहमच्या आजोबांची दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी ही भूमिका प्रेक्षकांना कमाल आवडली. त्यांच्यावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. कोव्हिडच्या या परिस्थितीमुळे मालिकांच्या चित्रीकरणावर जे निर्बंध आले होते त्यामुळे त्यांना या मालिकेतून आराम घ्यावा लागला होता. ते त्यांच्या ठाण्यातील घरीच आराम करत होते.
वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी भगवद्गीता तोंडपाठ करण्याचा विक्रम देखील केला होता आणि या परीक्षेत ते पहिले सुद्धा आले होते. नुकताच मराठी नाट्यसृष्टीतील मानाचा झी नाट्य जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. रवी पटवर्धन यांच्या जाण्यानं मराठी तसेच हिंदी कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी व त्यांची कुटुंब आहेत.