विजय सेतुपती यांचा ‘महाराजा’ असो किंवा मोहनलाल यांचा ‘दृश्यम’—या दोन्ही चित्रपटांची कथा, अभिनय आणि क्लायमॅक्स प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवणारे ठरले आहेत. क्वचितच असा एखादा सिनेप्रेमी असेल, ज्याने हे चित्रपट पाहिले नसतील. दरवर्षी साऊथ सिनेमातून अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, त्यापैकी काही सुपरहिट ठरून बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवतात. अशाच एका चित्रपटाची आज आपण चर्चा करणार आहोत, ज्याने थिएटरनंतर ओटीटीवरही धुमाकूळ घातला आणि ज्याचा क्लायमॅक्स पाहून अक्षरशः डोकं सुन्न होतं.
2018 साली प्रदर्शित झालेला ‘रतसासन’ हा तमिळ सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर आजही प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा एका सायको किलरभोवती फिरते. अरुण नावाचा तरुण दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पाहत असतो, मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर तो पोलीस अधिकारी बनतो. पुढे तो एका भयानक सिरीयल किलरचा माग काढतो, जो शाळकरी मुलींना लक्ष्य करून त्यांची निर्घृण हत्या करतो. एकदा हा चित्रपट पाहायला सुरुवात केली की शेवटपर्यंत नजर हटत नाही.
‘रतसासन’ची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याचा अंदाजबाहेरचा क्लायमॅक्स. अरुण कुमार (Arun Kumar)या पात्राच्या प्रवासातून उलगडणारी कथा थरार, भीती आणि मानसिक तणाव यांचा परिपूर्ण संगम आहे. विष्णु विशाल यांच्या दमदार अभिनयामुळे हे पात्र अधिक प्रभावी ठरते. राम कुमार दिग्दर्शित या चित्रपटात अमला पॉल, सरवनन यांच्यासह काली वेंकट, विनोदिनी वैद्यनाथन आणि रामदास यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. सस्पेन्स आणि अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतो.
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, अवघ्या 7 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘रतसासन’ने बॉक्स ऑफिसवर 23 कोटी रुपयांची कमाई केली होती. थिएटरनंतर ओटीटीवरही या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या हा चित्रपट जिओ सिनेमा आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येतो. IMDb वरही या चित्रपटाला 8.3 रेटिंग मिळाली आहे.
जर तुम्ही ‘महाराजा’ आणि ‘दृश्यम’सारख्या दमदार क्राइम-थ्रिलरचे चाहते असाल, तर ‘रतसासन’ ही तुमच्यासाठी एक परफेक्ट निवड ठरू शकते—जुनी कथा, पण आजही अंगावर काटा आणणारा अनुभव.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










