ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पती आणि महान अभिनेते धर्मेंद्र देओल यांना भारत सरकारकडून मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर करत धर्मेंद्र यांच्या अपार योगदानाची दखल घेतल्याबद्दल सरकारचे आभार मानले.
रविवारी हेमा मालिनी यांनी X वर लिहिले, – “धर्मेंद्र जी(Dharmendra) यांच्या चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाची दखल घेत सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले, याचा मला अत्यंत अभिमान आहे. ”दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोपरांत पद्म विभूषण देण्यात आले आहे. यापूर्वी 2012 मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
मिडियीशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, – “मला ही बातमी सकाळी कळली आणि मला त्यांचा प्रचंड अभिमान वाटतो. त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे. ते केवळ एक महान अभिनेता नव्हते, तर एक उत्तम माणूसही होते. ते नेहमी लोकांची मदत करायचे, जे खरंच असामान्य होते. ते या सन्मानाचे पूर्णपणे हकदार होते.” मात्र, त्यांनी हेही नमूद केले की, “हा सन्मान त्यांना याआधीच मिळायला हवा होता. पण उशिरा का होईना, त्यांना हा मान मिळणे हीच मोठी सन्मानाची बाब आहे.”
25 जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा – केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच 25 जानेवारी 2026 रोजी पद्म पुरस्कार 2026 विजेत्यांची यादी जाहीर केली. यामध्ये 5 जणांना पद्म विभूषण, 13 जणांना पद्म भूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार दिले जाणार आहेत. एकूण 131 मान्यवरांचा यंदाच्या पद्म सन्मान यादीत समावेश आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातीलही अनेक दिग्गजांचा समावेश असून, दिवंगत अभिनेता धर्मेंद्रपासून ते सतीश शाहपर्यंत अनेक नावांचा गौरव करण्यात आला आहे.










