Monday, February 2, 2026
Home अन्य ब्रेकिंग! प्रसिद्ध साहित्यकार लक्ष्मीनंदन बोरा यांचे कोरोनामुळे निधन; पद्मश्री पुरस्काराने केले होते सन्मानित

ब्रेकिंग! प्रसिद्ध साहित्यकार लक्ष्मीनंदन बोरा यांचे कोरोनामुळे निधन; पद्मश्री पुरस्काराने केले होते सन्मानित

कोरोना व्हायरसने मागील वर्षापासून माजवलेला हाहाकार अद्याप सुरूच आहे. या व्हायरसमुळे सामान्य व्यक्तींसोबतच प्रसिद्ध कलाकार, साहित्यकार आणि माध्यमात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. आसामचे प्रसिद्ध साहित्यकार लक्ष्मीनंदन बोरा यांची प्राणज्योत मावळली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर उद्भवणाऱ्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्यांचे गुवाहाटीच्या एका खासगी रुग्णालयात गुरुवारी (३ जून) निधन झाले.

लक्ष्मीनंदन हे ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या लक्ष्मीनंदन यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी २० मे रोजी झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. ते कोरोनातून ठीक झाले होते. मात्र, त्यानंतर ते आरोग्याशी संबंधित इतर समस्यांनी ग्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते.

त्यांना सरस्वती सन्मान आणि आसाम व्हॅली लिटरेरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी लक्ष्मीनंदन यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे. यासह त्यांनी म्हटले की, साहित्यकार लक्ष्मीनंदन यांच्यावर पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील.

विशेष म्हणजे त्यांनी ६० पेक्षाही अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील अधिकतर कादंबर्‍या आणि लघुकथांचे संकलन आहे. त्यांची पहिली कादंबरी ‘गंगा सिलोनिर पाखी’ ११ भाषांमध्ये अनुवादित झाली होती. त्यानंतर सन १९७६ मध्ये यावर एक चित्रपटही बनला होता. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लक्ष्मीनंदन आसामच्या साहित्य सभेचे अध्यक्षही राहिले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा