महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 34 वर्षीय अभिनेता आणि निर्मात्याने संगीतकार व चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांच्याविरोधात 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्यात आलेला नाही.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली येथील रहिवासी विज्ञान माने (Vigyan Mane)यांनी मंगळवारी सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे पलाश मुच्छल यांच्याविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करणारा अर्ज सादर केला आहे.
तक्रारीनुसार, 5 डिसेंबर 2023 रोजी सांगली येथे पलाश मुच्छल आणि विज्ञान माने यांची भेट झाली होती. यावेळी माने यांनी चित्रपट निर्मितीत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असता, मुच्छल यांनी आपल्या आगामी ‘नझरिया’ या प्रोजेक्टमध्ये निर्माता म्हणून गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर 25 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 12 लाख रुपयांचा नफा मिळेल, असा दावा मुच्छल यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच चित्रपटात भूमिकाही देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे म्हटले आहे.
तक्रारीनुसार, त्यानंतर दोघांची आणखी दोनदा भेट झाली आणि मार्च 2025 पर्यंत विज्ञान माने यांनी एकूण 40 लाख रुपये पलाश मुच्छल यांना दिले. मात्र, संबंधित प्रकल्प पूर्ण न झाल्याने माने यांनी आपले पैसे परत मागितले असता, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप आहे. अखेर त्यांनी सांगली पोलिसांकडे धाव घेतली. सध्या पोलीस प्राथमिक चौकशी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, संगीतकार पलाश मुच्छल हे अलीकडेच त्यांच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आले होते. भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू स्मृती मंधाना हिच्यासोबत त्यांच्या लग्नाची चर्चा होती. दोघांची साखरपुडाही झाला होता; मात्र लग्नाच्या आधीच हे नाते तुटले आणि दोघांनी लग्न रद्द केल्याचे समोर आले होते. या साखरपुड्यामुळे त्या काळात दोघेही चर्चेत राहिले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘मी राणीची मोठी फॅन आहे’ – अनुष्का शर्माचं ‘मर्दानी 3’ अभिनेत्रीच्या अभिनयावर कौतुक










