तब्बल ३६ वर्ष मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून पवन मल्होत्रा यांना मिळाला नाही अपेक्षित दर्जा; वाचा त्यांच्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टी


बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रतिभासंपन्न कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. तसेच अभिनयाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मुख्य अभिनेत्याला देखील अभिनयाच्याबाबतीत जोरदार टक्कर देणारे हे महत्वाच्या भूमिकेत दिसणारे कलाकार, आजही लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या बाबतीत मागे आहे. असेच अभिनेता म्हणजे पवन राज मल्होत्रा. ‘ब्लॅक फ्राईडे’, ‘डॉन’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘रूस्तम’ आदी चित्रपटांमधून त्यांच्या सशक्त अभिनयाची ताकद दाखवणारे पवन राज मल्होत्रा आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

पवन राज मल्होत्रा यांचा जन्म २ जुलै १९५८ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांची पदवी संपादन केली. सुरुवातीपासूनच पवन यांना अभिनयाची खूप आवड होती. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, पवन यांनी अभिनयसोडून व्यवसायात त्यांचे करियर करावे. मात्र शिक्षण झाल्यानंतर ते दिल्लीमधेच एका नाट्यसंस्थेसोबत जोडले गेले. नाटक करत असतानाच त्यांना दूरदर्शवरील त्यांची पहिली मालिका मिळाली.

साल १९८६ मध्ये त्यांना ‘नुक्कड’ नावाची पहिली मालिका मिळाली. या मालिकेत पवन यांनी ‘सईद’ नावाची भूमिका निभावली होती. या भूमिकेने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली. पवन यांच्यासाठी अभिनयच सर्वकाही होते. त्यामुळे त्यांनी अतिशय मनापासून त्याचे काम केले. ‘नुक्कड’ मालिकेसोबतच त्यांनी ‘ये जो है जिंदगी’, ‘मलाबार हिल्स’, ‘इंतजार’ आदी मालिकांमधून त्यांनी अभिनय केला.

पवन यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘नुक्कड’ मालिकेसंदर्भातला एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, “माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी फॅमिली बिजनेसमध्ये यावे. मात्र मला अभिनायची आवड असल्यामुळे मी अभिनयात आलो. माझ्या वडिलांचे जुन्या दिल्लीमध्ये ऑफिस होते. मी नेहमी तिथे जायचो. ‘नुक्कड’ मालिकेनंतर एक दिवस मी ऑफिसला गेलो, तेव्हा तिथे मला बघायला लोकांची गर्दी जमा झाली. ते लोकं माझ्या वडिलांकडे मला बाहेर बोलवण्याची विनंती करू लागले. माझ्या वडिलांनी मला बाहेर बोलवले, तेव्हा लोकं वेडे झाले आणि माझे नाव घेऊन जोरजोरात ओरडू लागले. ते पाहून माझे वडील अक्षरशः भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल मला गर्व दिसला. त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद मी आजही विसरू शकत नाही.”

पवन यांनी पुढे त्यांचा मोर्चा हळूहळू चित्रपटाकडे वळवला. १९८४ साली आलेल्या ‘अब आएगा मजा’ सिनेमातून त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. १९८५ साली आलेल्या ‘खामोश’ आणि १९८९ साली आलेल्या दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांच्या ‘बाघबहादुर’ आणि सईद अख्तर ‘मिर्जा’ यांचा चित्रपट ‘सलीम लंगड़े पे मत रो’ या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पवन यांनी त्याच्या करियरमध्ये अनेक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह भूमिका केल्या. प्रत्येक भूमिका त्यांनी उत्तम पद्धतीने साकारली. आणि त्या भूमिकेसाठी वाहवा मिळवली. अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या पवन यांनी अनेक मालिका, ५० पेक्षा अधिक सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्यांची नुकतीच ‘ग्रहण’ नावाची एक सीरिज प्रदर्शित झाली असून, त्यातल्या पवन यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’


Leave A Reply

Your email address will not be published.