Tuesday, July 9, 2024

‘पिफ’ला कायमस्वरूपी वास्तू देणार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘पिफ डिस्टिंग्विश अवॉर्ड’ प्रदान

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ)ला कायमस्वरूपी वास्तू उपलब्ध करून देणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘पिफ डिस्टिंग्विश अवार्ड’ प्रदान करण्यात आला.

पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल, फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू डॉ. मंगेश कराड, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, कॅनडाचे कॉन्सुल जनरल मायकल वोंक आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना महापौर म्हणाले, “पुणे चित्रपट महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकली आहे. यापुढेही हे काम अविरतपणे सुरु राहावे यासाठी महोत्सवाला कायमस्वरूपी वास्तू असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे महापालिका सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे. ” मोहोळ पुढे म्हणाले, “जगभरात अनेक व्यवस्थांवर कोविड काळात ताण आला. मनाला वेदना देणारी ही परिस्थिती होती. मात्र महोत्सवाच्या वतीने या काळात काम केलेल्या योध्यांचा गौरव करण्यात येत आहे, हे अतिशय मोठे काम आहे. या काळात पुणे महापालिकेचे ८५ लोक मृत्युमुखी पडले. त्यांचेही स्मरण करणे गरजेचे आहे.”

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सतीश मुंद्रा यांचा कोविड काळात केलेल्या कामाबद्दल महापौर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अमिताभ गुप्ता यावेळी म्हणाले, “सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य केले. सर्वांनी एकत्र काम केले म्हणून आपण सगळ्यांनी या महासाथीच्या काळात यशस्वीपणे पुढे गेलो.”

विक्रम कुमार म्हणाले, “या संपूर्ण कोविड काळामध्ये महापालिकेच्या १९ हजार कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची परवा न करता, दररोज काम केल्याने आपण सगळे शहर म्हणू पुढे जाऊ शकलो. यापुढेही कोणताही व्हेरियन्ट आला तरी आपण न घाबरता त्याचा सामना करू शकू.”

 

यावर्षीच्या कोविडच्या परिस्थितीमुळे हा महोत्सव यावर्षी डिसेंबरमध्ये होत असल्याचे सांगून, डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट महोत्सवाची माहिती दिली. ते म्हणाले, “आपण गेली दोन वर्षे व्हर्चुअल जगात आहोत. त्यामुळे चित्रपटगृहात येऊन कार्यक्रम पाहण्याचा हा अनुभव वेगळा आहे. कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या ज्या कोरोना योद्ध्यांनी काम केले त्यांचा कृतज्ञतापूर्वक पटेल यांनी उल्लेख केला आणि हा महोत्सव त्यांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. महोत्सवादरम्यान जगभरातील १२७ चित्रपट दाखविले जाणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा यावेळी चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पिफ डिस्टिंग्विश अवार्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. सराफ सत्काराला उत्तर देताना म्हणाले, “कलाकार काम करत असतात, पण त्याची कदर करणारी माणसे असावी लागतात. आज मला माझी नोंद घेतल्याचे समाधान आहे. या पुरस्काराने मला अनेक दिग्गजांच्या यादीत नेऊन बसविले. पिफने माझा हा सन्मान केला त्याबद्दल मी ऋणी आहे. रसिकांनी मला जे प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो.” मला माहितीये पुणेकरांचे माझ्यावर नेहमीच प्रेम होतं आहे आणि यानंतरही ते कायम राहिल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आगामी ८ दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवाची आज नांदी झाली. यावेळी आदिनाथ मंगेशकर, राहुल देशपांडे, ‘एमआयटी विश्वशांती गुरुकुल’तर्फे एमआयटी म्युझिक स्टुडिओ यांचे सादरीकरण झाले. निकिता मोघे यांच्या ‘पायल वृंद अकॅडमी’तर्फे विविध गाण्यांवर नृत्यं सादर करण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी निवडला दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारा जोडीदार

लग्नाच्या नुसत्या नावाने देखील चिडायची काजोल, मात्र अजयला भेटल्यानंतर बदलले विचार

बिकिनी घालून पोहणाऱ्या ‘या’ कोरिओग्राफरने लावली पाण्यात आग

हे देखील वाचा