बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या कोरोना महामारीच्या दरम्यान गरजू लोकांना निरनिराळ्या मार्गांनी मदत करत आहेत. त्यांना शक्य तितकी मदत ते करत आहेत. या कलाकारांमध्ये सोनू सूद, गुरमीत चौधरी, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार आहेत, जे गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. या कठीण काळात सोनू ज्या प्रकारे इतरांना मदत करत आहे, हे पाहून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. आता या यादीमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेचा देखील समावेश झाला आहे.
इतर कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री पूजा हेगडे देखील गरजूंची सेवा करण्यात गुंतली आहे. नुकतेच तिने १०० कुटुंबांसाठी महिनाभराची रेशनची व्यवस्था केली आणि या कठीण काळात त्यांना दिलासा दिला आहे. हे पाहता तिचे बरेच कौतुक होत आहे.
यापूर्वी पूजा स्वत: देखील कोव्हिड पॉझिटिव्ह झाली होती. तिने योग प्रशिक्षकासह श्वासोच्छवासाच्या व्यायामाचे लाईव्ह सेशनही आयोजित केले होते. त्या सेशन दरम्यान फुफ्फुसे कसे सुधारता येतील, याविषयी तिने सांगितले. योगाव्यतिरिक्त पूजाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि चाहत्यांना सांगितले होते की, ऑक्सिमीटरचा योग्य वापर कसा करावा.
पूजाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर येत्या काळात ती बऱ्याच रोचक चित्रपटांचा भाग बनणार आहे. ‘राधे श्याम’ या चित्रपटात ती अभिनेता प्रभाससोबत दिसणार आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटामध्ये आणि सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










