Thursday, October 16, 2025
Home मराठी कोरोना काळात दहावी पास झालेल्यांवर येतोय खास मराठी चित्रपट, सिनेमाचे नावही आहे भन्नाट

कोरोना काळात दहावी पास झालेल्यांवर येतोय खास मराठी चित्रपट, सिनेमाचे नावही आहे भन्नाट

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. तसेच हा विषाणू आता खूपच वेगाने नागरिकांना संक्रमित करताना दिसत आहे. मृतांचा आकडा देखील दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम देशातील अनेक घटकांवर झाला आहे. या परिस्थितीचा सगळ्यात मोठा फटाका बसलाय तो म्हणजे शैक्षणिक क्षेत्राला. कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा आणि कॉलेज बंद आहेत. जवळपास सगळ्या विद्यार्थ्याची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आहे. एवढंच काय तर इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले आहे. त्यातच सीबीएससी बोर्डच्याच्या आदेशानंतर आपल्या राज्य सरकारने देखील दहावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाने दहावीचे विद्यार्थी जरी भलतेच खुश झाले असले तरी हे शिक्षण कितपत उपयोगाचे आहे ?? हा प्रश्न आता सगळ्यांसमोर येऊन उभा राहिला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील या परिस्थितीचा आढावा घेऊन विजू माने एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा पोस्टर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच “मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.” असे कॅप्शन देखील दिले आहे.

https://www.instagram.com/p/CN9Pfjijxi-/

या आधी विजू माने यांनी देखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. ते लवकरच ‘शंकर पाटील ऑन मॅट्रिक’ हा चित्रपट घेऊन येणार आहेत. याची त्यांनी अधिकृतरीत्या माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तुम्ही बघू शकता की, चित्रपटाच्या नावासोबत ‘होय मी कोरोना लाभार्थी’ हे वाक्य दिसत आहे. तसेच पोस्टरमध्ये एका व्यक्तीच्या हातात बोर्डाच्या परीक्षेचा निकाल दिसत आहे.

दिग्दर्शक विजू माने यांनी हा पोस्टर शेअर करून असे कॅप्शन दिले होते की,” असे शिकून काय भरणार पोट ?? नी म्हणे हाताची घडी नी तोंडावर बोट.. याचा लवकरच चित्रपट गृहात निकाल लागणार.”

या चित्रपटात कोण कोण कलाकार असणार आहे, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे? याबाबतीत कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाहीये. अनेक कलाकार हा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून विजू माने यांना त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

हे देखील वाचा