Wednesday, April 9, 2025
Home मराठी प्रसाद ओकला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार, ‘बाबांना समर्पित’ म्हणत शेअर केली खास पोस्ट

प्रसाद ओकला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार, ‘बाबांना समर्पित’ म्हणत शेअर केली खास पोस्ट

नुकतीच या वर्षीच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर केलेल्या एका पत्रकात या पुरस्कारांबद्दल माहिती देण्यात आली आहे. यावर्षीचा हा पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, किंबहुना आजही गाजवत आहे. त्यांच्या या अनन्यसाधारण कर्तृत्वाचा सन्मान आता त्यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.

आशा भोसले यांच्यासोबतच अभिनेता प्रसाद ओकला त्याच्या चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. २४ एप्रिल २०२३ रोजी हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करत अभिनेता प्रसाद ओकने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “अत्यंत आनंदाची बातमी “

या वर्षीचा…
“मास्टर दीनानाथ मंगेशकर
विशेष पुरस्कार”
मला जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे. माझ्या चंद्रमुखी व धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीम चे आणि मायबाप प्रेक्षकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे…!!!

अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो…!!!”.

प्रसादच्या या पोस्टवर समीर चौगुले, संकर्षण कऱ्हाडे, अभिजित खांडकेकर, अमृता खानविलकर, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव आदी अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्याचे अभिनंदन केले आहे. तर नेटकऱ्यांनी देखील त्याचा अभिमान वाटतो म्हणत त्याचे कौतुक की आहे.

दरम्यान चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालनचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. सोबतच गायक पंकज उदास यांना देखील या पुरस्कारने सन्मानित केले जाणार आहे. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा