संजय कपूर यांच्या सुमारे 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या वादाला नवा वळण मिळाले आहे. संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर आणि करिश्मा कपूरची मुले समायरा व कियान यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात दररोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणात संजय कपूर यांची बहीण मंधिरा कपूर स्मिथ करिश्मा कपूर व त्यांच्या मुलांच्या बाजूने उघडपणे भूमिका मांडत असून, त्यांनी यापूर्वीही प्रिया कपूरवर अनेक टीका केल्या आहेत.
मुळात हा वाद करिश्मा कपूरची मुले आणि प्रिया सचदेव यांच्यात असला, तरी मंधिरा कपूर स्मिथ यांच्या हस्तक्षेपामुळे त्या स्वतःही कायदेशीर अडचणीत सापडल्या आहेत. प्रिया कपूर यांनी मंधिरा कपूर स्मिथ यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिजिटल प्लॅटफॉर्मवर सार्वजनिकपणे आपल्याविरोधात वक्तव्य केल्याचा आरोप करत प्रिया कपूर यांनी मंधिरा कपूर स्मिथ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रिया यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, मंधिरा यांनी केलेले दावे खोटे असून त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला गंभीर धक्का बसला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
या संपूर्ण प्रकरणावर मंधिरा कपूर स्मिथ यांनी एका मुलाखतीत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,
“मी जे काही बोलले आहे, ते न्यायालयातही नमूद केले गेले आहे. मग मी मानहानी कशी काय करते? जर मी काही खोटे बोलले असेल तर मला सांगा, कारण मी खात्रीने सांगू शकते की मी एकही खोटी गोष्ट सांगितलेली नाही. गंमत म्हणजे, या मानहानीच्या खटल्याबद्दल मलाही सोशल मीडियावरूनच कळत आहे. हे सगळं प्रकरण भरकटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या चाली आहेत.”
“प्रिया नाराज असेल तर मी काही करू शकत नाही”
मंधिरा पुढे म्हणाल्या, “प्रिया एखाद्या गोष्टीवर नाराज असेल तर त्यावर माझा काहीच ताबा नाही. मी जेव्हा माझ्या आईसोबत बसते, तेव्हा ती मला म्हणते – सगळं परत आणा, हे माझ्या आणि तुमच्या वडिलांनी उभं केलं होतं. आज माझ्या आईच्या नावावर काहीच नाही, हे खूप वेदनादायक आहे. कोणीही प्रियाला वेगळं करत नव्हतं किंवा तिचा वारसाहक्क हिरावून घेत नव्हतं. माझ्या आई-वडिलांनी कधीही सगळं काही एका मुलालाच देण्याचा विचार केला नव्हता.”
करिश्मा आणि मुलांच्या संपर्कात मंधिरा
मंधिरा यांनी सांगितले की, त्या सतत करिश्मा कपूर (Karisma Kapoor)आणि त्यांची मुले समायरा व कियान यांच्या संपर्कात आहेत. त्या म्हणाल्या, -“मुलांनी आपले वडील आणि जिवलग मित्र गमावला आहे, तर माझ्या आईने आपला मुलगा. हे आमच्यासाठी अत्यंत कठीण आहे. सगळे फक्त पैशांबद्दल बोलत आहेत, पण हा माझ्या वडिलांच्या वारशाचाही प्रश्न आहे. प्रिया माझ्या वडिलांबद्दल म्हणते की त्यांनी कंपनी बुडवली होती आणि संजयने ती उभी केली – पण हे खरे नाही. कंपनी त्यावेळीही चांगलीच चालू होती. मग मी तिच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करावा का?”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अक्षय कुमारच्या सिक्युरिटी कारचा अपघात, रिक्षाला धडकून SUV उलटली; मुंबईत घडली घटना


