हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटांइतकेच सामान्य लोकांना मदत करणार्या सेवाभावी वृत्तीसाठी विशेष प्रसिद्ध असतात. असे अनेक मोठमोठे कलाकार आहेत, ज्यांनी अनेकदा गरजूंना मदत करत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे. याचप्रमाणे सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले असून त्यांच्या दिलदारपणामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज त्यांच्या दर्जेदार चित्रपटांनी नेहमीच चाहत्यांना आकर्षित करत असतात. त्यांच्या चित्रपटांच्या कथेचे नेहमीच कौतुक होत असते. मात्र, सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनले असून त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खरं तर, विशाल भारद्वाज यांनी रस्त्यावर गजरे विकणार्या गरीब महिलेकडून सगळे गजरे विकत घेऊन तिला मदत केली आहे. याबरोबरच त्यांनी त्या महिलेची बिकट परिस्थितीसुद्धा सांगितली आहे. विशाल यांच्या या सहृदयी कृतीचे फक्त सामान्य लोकांमधून नव्हे, तर सिनेजगतातूनही कौतुक होत आहे.
विशाल भारद्वाज यांनी सांगितली गजरा विकणार्या महिलेची बिकट परिस्थिती
विशाल यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हातात गजरे घेतलेला एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी त्या गरीब महिलेबद्दल माहिती लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, “चित्रीकरण करताना एका गजरा विकणार्या महिलेला भेटलो. तिची रंजक कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी आहे. ती साहिबाबादवरुन रात्रीची दिल्लीला गजरे विकायला येते. या पैशांमधून तिचा घरखर्च चालतो. तिचा एक मुलगा आणि मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचा ही एकमेव आधार आहे.”
पुढे विशाल भारद्वाज यांनी या महिलेबद्दल एक रहस्य सांगितले. ज्यामध्ये ते लिहतात की, “यांच्या कुटुंबाला वाटते की त्या दिल्लीमधील मोठ्या रुग्णालयात कामाला आहेत. मात्र, त्या रस्त्यावर गजरे विकतात. या खोटे बोलण्यामागचा उद्देश असा की, त्यांना वाटते आपल्या मुलांना हे सत्य कधीच समजू नये. कारण, ते शिक्षण सोडून देतील आणि आईला हे काम करण्यापासून सोडवतील” या पोस्टच्या शेवटी विशाल यांनी “कधी कधी खोटं बोलणं चांगलं असतं आणि बोलणारी व्यक्ती सुंदर असते,” असा प्रेमळ संदेश दिला आहे.
विशाल भारद्वाज यांच्या या फोटोपेक्षा त्यांनी सांगितलेल्या कहाणीने सगळ्यांची मन जिंकली आहेत. या पोस्टवर अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांकाने “व्वा,” अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर रेखा भारद्वाज यांनीही हार्ट ईमोजी देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विशाल यांच्या या चित्रपटात झळकली आहे प्रियांका
विशाल भारद्वाज आणि प्रियांका चोप्राने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. ज्यामध्ये विशाल भारद्वाज यांच्या ‘7 खून माफ’ चित्रपटात प्रियांका शाहिद कपूरसोबत प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर विशाल यांनी ‘मकबूल’, ‘द ब्लू अंब्रेला’, ‘ओमकारा’, ‘इश्किया’, ‘हैदर’, ‘रंगून’, ‘पटाखा’ अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?
-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार
-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…