अपकमिंग चित्रपट ‘राहु केतु’ मधील कलाकार पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे चर्चेत आहेत. १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाआधी दोघांनीही आजच्या काळातील कॉमेडी, तिची जबाबदारी आणि प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामांवर स्पष्ट मत मांडले आहे.
एका शो दरम्यान पुलकित सम्राट (Pulkit Samrat)म्हणाला,“कधी-कधी लोक विनोद चुकीच्या पद्धतीने घेतात. त्यामुळे कलाकार म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढते. विनोद करताना मर्यादा ओलांडू नयेत आणि प्रेक्षकांची मानसिकता समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही नेहमीच ‘रूम रीड’ करतो – म्हणजे समोरचे प्रेक्षक कोणत्या प्रकारच्या जोक्ससाठी तयार आहेत, हे पाहतो.” कपिल शर्मा संदर्भात बोलताना तो म्हणाला, “कपिल स्वतःच्या अनुभवांमधून आणि आयुष्यातील प्रसंगांवरून लोकांना हसवतो. तो कोणालाही दुखावण्याच्या हेतूने रोस्ट करत नाही, म्हणूनच त्याची कॉमेडी सर्वांना भावते.”
याच मुद्द्यावर वरुण शर्मा म्हणाला, “एखाद्याची खिल्ली उडवणं ही आमच्यासाठी कॉमेडी नाही. ते सर्वात सोपं असतं, पण ते योग्य नाही. आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की आमच्या विनोदामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये. समोर हसणारी व्यक्ती घरी गेल्यावर दुखावलेली वाटू नये, हीच खरी जबाबदारी आहे.”
दरम्यान, ‘राहु केतु’ हा पौराणिक कथांवर आधारित एक अनोखा कॉमेडी-अॅडव्हेंचर चित्रपट आहे. विपुल विग दिग्दर्शित या सिनेमात पुलकित सम्राट ‘केतु’ तर वरुण शर्मा ‘राहु’च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या भन्नाट कारनाम्यांमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं आश्वासन चित्रपट देतो. ट्रेलरला मिळालेल्या पहिल्या प्रतिक्रिया पाहता, कॉमेडीप्रेमी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट खास ठरण्याची शक्यता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










