क्रीडा क्षेत्रातील बॅडमिंटन हा खेळ म्हटले की, पी. व्ही. सिंधू हे नाव पटकन डोक्यात येते. पी. व्ही. सिंधू हीने दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल मिळवले आहे. या खेळासाठी तिच्यामध्ये असलेल्या कलागुणांमुळे ती नेहमी प्रकाश झोतात असते.
मात्र, सध्या सिंधू एका वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतात आली आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि या व्हिडिओबाबत तिचे कौतुक देखील होत आहे. परंतू, हा व्हिडिओ खेळासंबंधीत नसून चक्क तिच्या डान्सचा आहे.
पी. व्ही. सिंधूने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर ताल धरताना दिसत आहे. तिचा हा डान्स आणि लूक खूप चर्चेत आहे. अनेक जण तिच्या अनोख्या डान्स स्टेपचे कौतुक करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की तिने पिस्ता रंगाचा घागरा घातलेला आहे. तिच्या या घागऱ्यावर हिऱ्यांची नक्षी आहे. तसेच तिने लूक पूर्ण करण्यासाठी आकर्षक हिऱ्याचे दागिनेही घातले आहेत. यामध्ये तिने गळ्यात मोठा नेकलेस, कमरपट्टा आणि कानात दागिने घातले असून बोटांमध्ये हिऱ्याची अंगठी देखील घातली आहे.
लाईट मेकअप आणि मोठ्या अलंकारांमुळे तिचे रुप अगदी खुलून दिसते. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी तूफान लाइक्स आणि हार्ट ईमोजीचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंटमध्ये देखील तिचे मोठे कौतुक होताना दिसत आहे.
पी.व्ही. सिंधूने तिचा हा लूक दिवाळीसाठी केला होता. दिवाळी साजरी करत असताना तिने या व्हिडिओसह काही फोटो देखील शेअर केले होते. यातील एका फोटोमध्ये तिने हातामध्ये दिवा घेतलेला आहे आणि ती या दिव्यातील ज्योतीकडे पाहात आहे. तिच्या या फोटोंवर देखील चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजीचा वर्षाव केलेला आहे.
पी.व्ही.सिंधूच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास तिने साल २०१६ मध्ये रियो ऑलिंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकेले आहे. तसेच टोक्यो ऑलिंपिक्समध्ये तिने कांस्य पदकावर स्वतःचे नाव कोरले आहे.










