मंगळवार, 27 जानेवारी रोजी प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केली. या घोषणेमुळे त्यांचे कोट्यवधी चाहते भावूक झाले असून, फिल्मसृष्टीतील अनेक कलाकारांनाही धक्का बसला आहे. श्रेया घोषाल आणि कुमार सानू यांसारख्या दिग्गज गायकांनीही अरिजीतच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
आज लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या अरिजीत सिंहने (Arijit Singh)आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात 2005 साली ‘फेम गुरुकुल’ या लोकप्रिय रियालिटी शोमधून केली होती. मात्र, तो हा शो जिंकू शकला नव्हता. इतकेच नाही तर तो टॉप 5 स्पर्धकांमध्येही स्थान मिळवू शकला नव्हता. त्या सिझनचा विजेता ठरला होता काश्मिरी गायक काजी तौकीर, तर रूपरेखा बॅनर्जी ही सह-विजेती होती.
‘फेम गुरुकुल’ जिंकल्यानंतर काजी तौकीर यांना काही गायन प्रोजेक्ट्स मिळाले, मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही. काही रिमिक्स गाणी गाऊनही त्यांचा करिअर वेग पकडू शकला नाही. मात्र 2015 मध्ये प्रदर्शित ‘फॅन्टम’ चित्रपटातील कॅटरीना कैफवर चित्रित झालेल्या ‘अफगान जलेबी’ या गाण्यात ते झळकले. या गाण्यात कॅटरीनासोबत नाचणारी व्यक्ती म्हणजे काजी तौकीरच होते. हीच त्यांची शेवटची मोठी ऑनस्क्रीन झलक ठरली.
सध्या काजी तौकीर लाइमलाइटपासून दूर असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे सुमारे 1.61 लाख फॉलोअर्स आहेत. 2024 मध्ये त्यांनी अरिजीत सिंहसोबत झालेल्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओही शेअर केला होता. अरिजीत नोव्हेंबर 2024 मध्ये काश्मीरमध्ये कॉन्सर्टसाठी गेले असताना काजी तिथे उपस्थित होते. आता काजी काश्मीरमध्येच स्थायिक झाले असून, छोटे-मोठे इव्हेंट्स आणि शोमध्ये गायन करत आहेत.
एकीकडे शो जिंकूनही काजी तौकीर हळूहळू गुमनाम होत चालले आहेत, तर दुसरीकडे अरिजीत सिंह असे नाव बनले आहेत, जे संगीतप्रेमी कधीही विसरू शकणार नाहीत.
हेही वाचा










