फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये सतत बदल होत असल्याने हा प्रोजेक्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रणवीर सिंगने चित्रपटातून माघार घेतल्याच्या चर्चा, त्यानंतर कियारा अडवाणी आणि विक्रांत मॅसी यांची नावे बाहेर पडल्याच्या बातम्यांनंतर आता एका नव्या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी फरहान अख्तर अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi)यांचा विचार करत आहेत.
अलीकडेच ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ (2025) या सीरिजमधील भूमिकेमुळे रजत बेदी पुन्हा चर्चेत आले असून, त्याचा फायदा त्यांना होताना दिसतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय रजत बेदी त्या भूमिकेसाठी चर्चेत आहेत जी याआधी विक्रांत मॅसी यांच्यासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र,अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील अभिनयामुळे रजत बेदींची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे. एका जवळच्या सूत्रानुसार, अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. सूत्राने एचटीला सांगितले,
“फरहान आणि रजत यांच्यात अधिकृत संवाद झाला आहे. जानेवारीच्या मध्यात खार येथील फरहान यांच्या कार्यालयात भेट होऊन भूमिकेबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.”
जुलै २०२५ मध्ये विक्रांत मॅसी ‘डॉन 3’ मधून बाहेर पडल्याची बातमी समोर आली होती. इंडस्ट्रीतील जाणकारांच्या मते, त्यांच्या भूमिकेत अपेक्षित बदल आणि खोली न आल्यामुळे अंतिम स्क्रिप्टमध्ये ती भूमिका टिकू शकली नाही. त्या काळात आदित्य रॉय कपूर आणि विजय देवरकोंडा यांची नावेही संभाव्य पर्याय म्हणून चर्चेत होती. मात्र, पटकथेत आणखी बदल होईपर्यंत निर्मात्यांनी पुढील निर्णय न घेण्याचा निर्णय घेतला होता.
‘डॉन 3’ मध्ये रणवीर सिंगच्या सहभागाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. धुरंधर या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. सुरुवातीला रणवीरने धोरणात्मक कारणांमुळे चित्रपट सोडल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र नंतर समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचा प्रोजेक्टपासून दूर होण्यामागे बॉक्स ऑफिस नव्हे तर सर्जनशील मतभेद कारणीभूत होते.
रणवीर सिंग किंवा चित्रपटाच्या टीमकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र, मोठ्या फ्रँचायझी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे मतभेद सामान्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘डॉन’ फ्रँचायझीच्या भक्कम वारशामुळे कास्टिंगबाबत सुरू असलेल्या चर्चांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
सुरुवातीला २०२५ मध्ये शूटिंग सुरू होण्याची अपेक्षा होती, मात्र आता ‘डॉन 3’चे चित्रीकरण २०२६ च्या सुरुवातीला सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. महत्त्वाच्या भूमिका आणि पटकथेत बदल सुरू असल्याने, निर्माते अंतिम कास्ट जाहीर करण्याआधी सर्जनशील दृष्टिकोन पूर्णपणे निश्चित करण्यावर भर देत आहेत. अधिकृत घोषण होईपर्यंत ‘डॉन 3’ हा प्रोजेक्ट सतत बदलाच्या प्रक्रियेतच राहणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सासऱ्यांच्या निधनाने कोलमडले अर्जुन बिजलानी, अखेरच्या निरोपावेळी मुलाला मिठीत घेऊन झाले भावूक










