Tuesday, July 9, 2024

राजकुमारांनी अनेक दशकं केलंय चित्रपटसृष्टीवर राज्य, स्वत: च्या मृत्यूबद्दल मुलाला सांगितली होती ‘ही’ गोष्ट

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण एक असे कलाकार होते ज्यांनी केवळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले नाही, तर फिल्म इंडस्ट्रीनेही त्यांना ‘राजकुमार’ मानले. आपल्या दमदार आवाजासाठी ओळखले जाणारे राजकुमार यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने एक विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या जबरदस्त आवाजात बोललेला ‘जानी’ अजूनही चाहत्यांच्या ओठांवर आहे. शुक्रवारी (८ ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस आहे. चला तर मग त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.

उपनिरीक्षक म्हणून काम केले
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ८ ऑक्टोबर १९२६ रोजी जन्मलेल्या राजकुमार यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबईतील माहीम पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एके दिवशी रात्रीच्या गस्तीच्या वेळी एक शिपाई राजकुमारला म्हणाला, “हजूर, तुम्ही दिसण्यात आणि उंचीमध्ये हिरोपेक्षा कमी नाही. जर तुम्ही चित्रपटांमध्ये हिरो बनलात, तर तुम्ही लाखो हृदयांवर राज्य करू शकता.” शिपायचे हे विधान राजकुमार यांना सुखावणारे होते.

असे खुलले भाग्य
मुंबईतील पोलीस स्टेशन जेथे राजकुमार कार्यरत होते, तिथे चित्रपटसृष्टिशी संबंधित लोकांची वारंवार ये -जा सुरू होती. एकदा पोलीस ठाण्यात चित्रपट निर्माते बलदेव दुबे काही महत्वाच्या कामासाठी आले होते. ते राजकुमार यांच्या संभाषणाच्या अंदाजाने प्रभावित झाले आणि त्यांनी राजकुमार यांना त्यांच्या ‘शाही बाजार’ चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याची संधी दिली. शिपायाचे म्हणणे ऐकून अभिनेता बनण्याचे राजकुमार यांनी आधीच ठरवले होते. त्यामुळे त्यांनी लगेच आपल्या उपनिरीक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि निर्मात्याची ऑफर स्वीकारली.

सुरुवातीची कारकीर्द होती आव्हानांनी भरलेली
‘शाही बाजार’ तयार होण्यास बराच वेळ लागला. म्हणून त्यांनी १९५२ साली प्रदर्शित झालेल्या ‘रंगीली’ चित्रपटातील एक छोटी भूमिका स्वीकारली. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट कधी सुरू झाला आणि कधी गेला हेही कळाले नाही. दरम्यान, त्यांचा ‘शाही बाजार’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर पडला. ‘शाही बाजार’च्या अपयशानंतर राजकुमार यांचे सर्व नातेवाईक म्हणू लागले की, तुझा चेहरा चित्रपटासाठी योग्य नाही. त्याचवेळी काही लोक म्हणू लागले की, तुम्ही खलनायक बनू शकता.

राजकुमार यांनी चित्रपटसृष्टीत १९५२ ते १९५७ पर्यंत आपले स्थान निर्माण करण्यासाठी बराच संघर्ष केला. ‘रंगीली’नंतर राजकुमार यांनी त्यांना जी भूमिका मिळाली ती स्वीकारली. त्यांनी ‘अनमोल सहारा’, ‘अवसर’, ‘घमंड’, निलामणि आणि ‘कृष्ण सुदामा सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. पण यापैकी कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही. मेहबूब खान यांच्या १९५७ च्या ‘मदर इंडिया’ चित्रपटात राजकुमार हे एका खेड्यातील शेतकऱ्याच्या छोट्या भूमिकेत दिसले. जरी चित्रपट पूर्णपणे अभिनेत्री नर्गिसवर केंद्रित होता. तरीही ते आपल्या अभिनयाची छाप सोडण्यात यशस्वी झाले. या चित्रपटात त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीही मिळाली आणि चित्रपटाच्या यशानंतर ते अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत स्थापित झाले.

इंडस्ट्रीमध्ये मिळाले यश
साल १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पैगाम’ या चित्रपटात ते हिंदी चित्रपट जगताचे सम्राट दिलीप कुमार यांच्यासमोर होते. पण राजकुमार इथेही आपल्या दमदार भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या टाळ्या लुटण्यात यशस्वी ठरले. यानंतर, ‘दिल अपना आणि ‘प्रीत पराई’, ‘घराना’, ‘गोदान’, ‘दिल एक मंदिर’ आणि ‘दूज का चांद’ यांसारख्या चित्रपटांतील यशामुळे ते अशा स्थितीत पोहोचले, जिथे ते स्वतःच्या भूमिका निवडू शकतील.

‘काजल’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर, राजकुमार यांनी अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बीआर चोप्रा यांच्या १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वक्त’ या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटात राजकुमार यांनी बोललेला एक डायलॉग “जिनके घर शीशे के बने होते, है वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेंका करते” आणि “ये छुरी बच्चों के खेलने की चीज नहीं। हाथ कट जाये तो खून निकल आता है.” प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. कालांतराने राजकुमार यांनी प्रसिद्धीची उंची गाठली. ९० च्या दशकात त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. या काळात त्यांचे ‘तिरंगा’, पुलिस और मुजिरम, ‘इंसानियत के देवता’, ‘बेताज बादशाह’ आणि ‘गन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.

मृत्यूबद्दल सांगितली ‘ही’ गोष्ट
एकटे राहणाऱ्या राजकुमार यांना असे वाटले की, मृत्यू त्यांच्या अगदी जवळ आला आहे. म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा पुरू राजकुमारला त्यांच्याकडे बोलावले आणि म्हणाले, “पाहा, मृत्यू आणि जीवन ही माणसाची वैयक्तिक बाब आहे. माझा मित्र चेतन आनंद वगळता इतर कोणालाही माझ्या मृत्यूबद्दल सांगू नको. माझे अंतिम संस्कार केल्यानंतरच फिल्म इंडस्ट्रीला माहिती दे.” आपल्या गंभीर अभिनयाने जवळजवळ चार दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे महान अभिनेते राजकुमार यांनी ३ जुलै १९९६ रोजी या जगाचा निरोप घेतला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा