राजकुमार राव (Rajkumar Rao) हा हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणतीही अभिनय पार्श्वभूमी नसताना त्याने मिळवलेले हे यश नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारे आहे मात्र या यशाच्या शिखरावर पोहोचायला राजकुमार रावला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना त्याने आपल्या या संघर्षाबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी ‘हिट: द फर्स्ट केस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्याने आपल्या अभिनय प्रवासाबद्दल सांगितले. शिवाय, त्याचे स्ट्रगलच्या दिवसाच्या आठवणीही सांगितल्या.याबद्दल बोलताना राजकुमारने सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा त्याला फक्त बिस्किटे खाऊन जगावे लागत होते. राजकुमार म्हणाला, “सिने जगतात नवखा असल्यामुळे खूप अडचणी आल्या. मी गुरुग्राममध्ये एकत्र कुटुंबात वाढलो आणि त्यावेळी ते एक छोटे शहर होते. मी लहानपणी सिनेमाच्या प्रेमात पडलो आणि मला हेच करायचं आहे हे मला माहीत होतं. मी थिएटर करत असताना दिल्लीपर्यंत सायकल चालवत असे. येणे-जाणे मिळून एकूण ७० किमी. मग मी FTII मध्ये खूप मेहनत केली. तिथे मला जमेल तितकं शिकायचं होतं.”
राजकुमार पुढे म्हणाला, “त्यानंतर मी मुंबईत आलो, पण इथे राहणे खूप अवघड होते. एक वेळ अशी होती की मी पार्ले जी पॅकेट्सवर संपूर्ण दिवस घालवायचो. माझ्या खात्यात फक्त 18 रुपये शिल्लक होते. सुदैवाने मला फिल्म स्कूलमध्ये काही चांगले मित्र भेटले, जे मला मदत करायचे. पण, या काळात माझा बी प्लान नव्हता. माझे एकच स्वप्न होते आणि ते म्हणजे अभिनेता होण्याचे.’ राजकुमारचा जन्म 31 ऑगस्ट 1984 रोजी गुरुग्राममध्ये झाला होता. या अभिनेत्याने 2010 मध्ये ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो ‘रागिनी एमएमएस’, ‘गँग्स ऑफ वासेपूर 2’, ‘तलाश’मध्ये दिसला. शाहिद, ‘काई पो चे’, ‘क्वीन’, ‘डॉली की डोली’, पण 2017 मध्ये आलेला ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट त्याच्या करिअरचा गेम चेंजर ठरला.