कोरोनाचा जप करता करता अखेर हे वर्ष सरलं एकदाचं! परंतु आपल्या भारतात कोरोनापेक्षाही जर कुणाच्या नावाची जास्त चर्चा झाली असेल ती म्हणजे कंगना रनौतची! गमतीने म्हणतोय मंडळी. कोरोनासारखी चर्चा कुणाची नाही. तर आपण कंगनाबद्दल बोलत होतो. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने नेपोटीझमचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर सतत माध्यमांतून तिचं मत व्यक्त करत राहिली. यानंतर तिला ड्रग्जचा मुद्दा मिळाला आणि त्यावर ती बोलू लागली. असे एकावर एक मुद्दे ती शोधतच राहिली. मग मुंबईची सुरक्षा, बॉलिवूड कलाकारांना नावं ठेवणं, शेतकरी आंदोलन अशा सर्व प्रकरणांमध्ये ती कायम बोलत राहिली आणि पुन्हा एकदा चर्चेत राहिली. कदाचित हेच तिचं एकमेव ध्येय असावं की इतपर्यंत शंका लोकं घेऊ लागले.
कंगना रनौत ही सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी चित्रपट धाकडचं चित्रीकरण करत आहे. यावेळी एक पत्रकार परिषद घेऊन तिने पुन्हा एक नवं वादग्रस्त विधान केले आहे. देशातील अल्पवयीन मुलींवर गॅंगरेप करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत भर चौकात लटकवलं जात नाही, तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत. त्या अनुषंगाने कडक कारवाई करत ५-६ उदाहरणं समाजासमोर ठेवली पाहिजेत. सौदी अरेबियासारख्या कित्येक देशांत आजही बलात्कार करणाऱ्या आरोपीला भर चौकात लटकवलं जातं, याची आठवण करून देताना कंगनाने असे कायदे भारतातही आणण्याची गरज असल्याचे तिने म्हटलं आहे. त्यासाठी जुन्या भारतीय कायद्यांत बदल करावा. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पीडितेवर असल्याने बऱ्याचदा आरोपी कायदेशीर कचाट्यातून सुटतो. त्यामुळे कायदे आणखी कडक करण्याची गरज असल्याचं तिने या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
सध्या उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यात लव्ह जिहाद हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याला कंगना रणौतने आपलं समर्थन दिलं आहे. यावेळी ती म्हणाली की, ‘ लव्ह जिहाद कायदा चांगला आहे. हा कायदा केवळ त्यांच्यासाठी आहे, जे लव्ह जिहाद करतात. तसेच आंतरजातीय विवाहात धोका देणाऱ्या व्यक्तींसाठी हा कायदा असल्याचंही तिने म्हटलं आहे.