दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाचा (Ravi Teja) ‘खिलाडी’ हा चित्रपट रिलीझ होताच वादात सापडला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक रतन जैन यांनी रवी तेजाच्या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात चित्रपटाच्या नावाबाबत खटला दाखल केला आहे. वास्तविक, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) १९९२मध्ये आलेल्या चित्रपटाचे नाव देखील ‘खिलाडी’ होते, ज्याचे दिग्दर्शन रतन जैन यांनी केले होते. अशा परिस्थितीत रवी तेजाच्या या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षकासाठी परवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका मुलाखतीत रतन जैन यांनी सांगितले की, “आमच्याकडे ‘खिलाडी’ नावाची ट्रेडमार्क नोंदणी आहे. हा ट्रेडमार्क संपूर्ण देशासाठी आहे. मनोरंजन विश्वातील कोणताही खेळाडू या नावाचा वापर करू शकत नाही. ‘सबसे बडा खिलाडी’, ‘खतरों के खिलाडी’ सारख्या इतर चित्रपटांचं काही नाही, पण फक्त ‘खिलाडी’ हा आमचा ट्रेडमार्क आहे.” (ravi teja film khiladi got into legal trouble soon after its released)
मुलाखतीदरम्यान रतन जैन पुढे म्हणाले की, “११ फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास उशीर झाल्याचे सांगितले होते. त्याचवेळी आम्ही हेही स्पष्ट केले की आम्हाला चित्रपटाचे प्रदर्शन थांबवायचे नाही. निर्मात्यांनी असे का केले हे आम्हाला माहित नाही. त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर ८ फेब्रुवारीला, खूप उशिरा रिलीझ केला आहे. जो चित्रपटाच्या रिलीझच्या २ दिवस आधी होता. दरम्यान, आम्ही ९ फेब्रुवारी रोजी केसची तयारी केली आणि १० तारखेला दिल्ली उच्च न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी ठेवले. त्यामुळे या प्रकरणात आमच्याकडून उशीर झालेला नाही.”
रतन जैन पुढे सांगतात की, “आज त्यांनी फक्त या चित्रपटाचे शीर्षक घेतले आहे. उद्या ते बॉलिवूडच्या इतर अनेक मोठ्या चित्रपटांची टायटल्स घेतील. यामुळे खूप त्रास होईल. जर तुम्ही आज गुगलवर खिलाडी सर्च केलं, तर तुम्हाला फक्त तेलुगु चित्रपटच दिसतील, जे बरोबर नाही. ही कॉपीराइटची बाब आहे आणि निर्मात्यांनी ती मान्य करावी.”
त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या तेलगू चित्रपटाच्या निर्मात्यांनी दक्षिण असोसिएशनकडे ‘खिलाडी’ शीर्षकाची नोंदणी केली आहे.
हेही वाचा –