बॉलिवूडवर तब्बल ४६ वर्षे राज्य करणार्या रीना रॉय यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी झाला. गुरुवारी रीना रॉय यांनी ६४ वा वाढदिवस साजरा केला. रीना रॉय एक अशा बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेपासून आईच्या भूमिकेपर्यंत सर्व पात्रे निभावली आहेत. त्यांच्या काळात त्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. रीना रॉय यांना चित्रपटांपासून फारकत घेऊन आता जवळपास २० वर्षे झाली आहेत. चला तर मग त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
रीना रॉय यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात १९७२ च्या ‘जरूरत’ या चित्रपटाद्वारे केली होती. असं म्हणतात की रीना रॉय यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी रीना रॉय यांना कामाची नितांत गरज होती. अशा परिस्थितीत रीना प्रत्येक लहान-मोठ्या भूमिका करण्यासाठी सज्ज होत्या. चित्रपटसृष्टीत त्यांचा कोणताही गॉडफादर नव्हता. रीना रॉय यांनी ‘जरूरत’च्या आधी बीआर ईशाराच्या ‘नई दुनिया नये लोग’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. परंतु या चित्रपटादरम्यान असं काही घडलं की रीना यांच्या हातातून बरेच चित्रपट निघून गेले.
‘नई दुनिया नये लोग’ चित्रपटाचं आऊटडोअर चित्रीकरण सूर होतं. संपूर्ण युनिट बंगळुरूपासून पन्नास मैलांवर जंगलात होतं. जवळून फक्त एक रेल्वे लाईन गेली होती. सिन शूट करण्यासाठी सर्व तयारी केली गेली होती, फक्त ट्रेन येण्याची वाट सगळेजण पहात होते. सीनच्या पार्श्वभूमीवर ट्रेनची आवश्यकता होती. चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक बी.आर. इशारा यांनी रीना रॉय आणि सत्येन यांना बोलावून स्पष्ट केलं की- ‘पाहा, माझ्याकडे पैसे नाहीत. चोवीस तासात येथुन फक्त एकच ट्रेन जाते. ही ब्रांच लाईन आहे. आपण दोघांनीही आपआपले संवाद चांगल्या प्रकारे पाठ करा, रिहर्सल करा. जर ट्रेन आल्यानंतर जराशीही चूक झाली तर उद्या मला बंगळुरूहून संपूर्ण युनिटला इथे पुन्हा आणणे मला परवडणार नाही.’
रीना रॉय आणि सत्येन यांनी त्यांना हमी दिली की ट्रेन येऊ द्या काहीही गडबड होणार नाही. दूरवरुनच गाडीची शिटी वाजली. संपूर्ण युनिट तयार झालं. गाडी जवळ आली. रीना रॉय यांनी सत्येनच्या डोळ्यात डोकावून आपले संवाद बोलण्यास सुरवात केली, पण मध्येच त्या संवाद विसरल्या आणि गाडी निघून गेली. इशारा यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. रीना यांच्या डोळ्यात अश्रू आले होते पण गाडी गेली होती. त्यांच्या बेजबाबदारपणाची हवा बंगळुरूपासून मुंबईपर्यंत अशा प्रकारे पसरली की रीना रॉय यांच्या हाती आलेल्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या जागी इतर नायिकांची वर्णी लागली.
यानंतर, रीना सहमत झाल्या की आता त्यांना त्यांच्या अभिनयावर खूप लक्ष केंद्रित करावं लागेल. यानंतर इशारा यांच्याच ‘जरूरत’ चित्रपटाचा सीन होता. यावेळी ट्रेनच्या ठिकाणी सूर्य होता. ट्रेनदेखील चोवीस तासात एकदा येत होती, आणि सूर्यास्त देखील चोवीस तासात एकदाच होतो. रीना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाल्या, ‘इशारा जी, कृपया विजय अरोरास हा सीन चांगल्या प्रकारे समजावून सांगा, त्यांनी जराशीही चूक करायला नको आणि हो, माझ्याकडून चूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी गाडी बंगळुरूमध्ये जाऊ दिली होती, परंतु यावेळी मी सूर्य मावळू देणार नाही’ आणि खरोखर असंच घडलं. रीना यांनी सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर एक जबरदस्त टेक दिला. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रीना यांची बॉलिवूडमध्ये चर्चा होऊ लागली होती.










