[rank_math_breadcrumb]

सुशांतच्या मृत्यूनंतर 6 वर्षांनी रिया चक्रवर्तीच्या आयुष्याला कलाटणी, दमदार कमबॅकमध्ये विजय वर्मासोबत जमणार जोडी; 7 वर्षांचा सांगितला संघर्ष

अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. दीर्घ विश्रांतीनंतर ती वेब सीरिज ‘फॅमिली बिझनेस’च्या माध्यमातून आपल्या अभिनय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू करत आहे. या पुनरागमनाबाबत रियाने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात तिचा उत्साह, भीती आणि आशा स्पष्टपणे दिसून येतात.

व्हिडीओमध्ये रिया (Riya)सांगते की तिला एखाद्या सेटवर पाऊल ठेवून जवळपास सात वर्षे झाली आहेत, मात्र अभिनयाविषयीची तिची आवड आजही तितकीच तीव्र आहे. “मी आजही तीच मुलगी आहे, जी 17व्या वर्षी अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. माझा एक भाग पुढे गेला, पण दुसरा भाग तिथेच थांबून वाट पाहत होता,” असे ती म्हणते. आता ती पुन्हा एकदा आपल्या ‘चॅप्टर 2’मध्ये परतल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये रियाने आयुष्यातील चढ-उतारांवरही भाष्य केले. आयुष्य अनेकदा अनपेक्षित वळणं घेतं आणि तीच वळणं आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतात, असं तिने नमूद केलं. तिच्या या प्रामाणिक भावनांवर चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी तिला धैर्य, ताकद आणि नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रिया चक्रवर्तीने अगदी कमी वयात मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. 2009 मध्ये एमटीव्हीच्या ‘टीन दिवा’ या रियालिटी शोमधून तिने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती लोकप्रिय व्हीजे झाली. 2012 मध्ये तेलुगू चित्रपट ‘तुनिगा तुनिगा’मधून तिने अभिनयात पदार्पण केलं, तर 2013 मध्ये ‘मेरे डॅड की मारुती’द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

2020 नंतर तिचं करिअर अचानक थांबलं. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर रियाला कायदेशीर चौकशी, मीडिया ट्रायल आणि टीकेला सामोरं जावं लागलं. एनसीबी प्रकरणात तिला अटक होऊन 28 दिवस तुरुंगवास भोगावा लागला. अखेर मार्च 2025 मध्ये सीबीआयकडून तिला क्लीन चिट मिळाली.

आता ‘फॅमिली बिझनेस’ या नेटफ्लिक्सवरील हाय-स्टेक कॉर्पोरेट ड्रामामधून रिया नव्या जोमाने पुनरागमन करत आहे. या सीरिजमध्ये अनिल कपूर आणि विजय वर्मा पहिल्यांदाच एकत्र दिसणार असून, दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. संघर्षातून पुन्हा उभं राहत, रिया चक्रवर्ती आपल्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

आई झाल्यानंतर नीना गुप्ता तुटल्या, बेघरपणात गेलं आयुष्यातला काळोखाचा काळ; संघर्षाने दिली नवी ओळख