Tuesday, July 9, 2024

लग्नाच्या वाढदिवसानंतर लगेच रितेश आणि जिनिलिया यांनी दिली गोड बातमी, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia D’Souza Deshmukh) या बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपलने नुकताच त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानंतर त्यांनी लगेचच एक गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली लग्न केले त्यानंतर जिनिलियाने कामापासून ब्रेक घेतला आणि ती तिच्या घरात मुलांमध्ये व्यस्त झाली. तर रितेशने देखील एक विनोदी अभिनेता ही इमेज तोडत वेगवेगळ्या भूमिका देखील उत्तम पद्धतीने साकारल्या. दोन, तीन चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले. ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हा त्यांचा शेवटचा सोबतचा सिनेमा होता. त्यानंतर त्यांच्या फॅन्सला त्यांना पुन्हा सोबत बघण्याची खूप इच्छा होती. मात्र मधल्या काही काळात ते शक्य झाले नाही, मात्र आता लवकरच फॅन्सची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

तत्पूर्वी रितेश आणि जिनिलिया यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले. ते फोटो पाहून मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण होते. कारण या फोटोमध्ये जिनिलिया प्रेग्नेंट दिसत असल्याने लवकरच ते त्यांच्या तिसऱ्या बाळाचे स्वागत करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र असे काहीही नसून, त्या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो त्यांच्या आगामी ‘मिस्टर मम्मी’ या सिनेमाचे आहे. हो, नुकतीच रितेश आणि जिनिलिया यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy) सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी रितेश आणि जिनिलिया एकत्र काम करताना फॅन्सला पाहायला मिळणार आहेत. सिनेमाच्या पोस्टरवरून तर हा एक तुफान कॉमेडी चित्रपट दिसत आहे. रितेश एक विनोदी अभिनेता म्हणूनच ओळखला जातो. याआधी तो अनेक कॉमेडी सिनेमात दिसला होता. मात्र जिनिलियाने अजूनपर्यंत तरी फुल फ्लेज कॉमेडी चित्रपटांमध्ये केली नव्हती. मात्र आता या सिनेमात पहिल्यांदाच हे दोघे एकत्र कॉमेडी करताना दिसणार आहेत. या पोस्टरमध्ये रितेशसुद्धा जिनिलिया सारखा प्रेग्नेंट दिसत आहे. त्यामुळे चित्रपटात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की.

जिनिलियाने या सिनेमाचे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही याआधी कधीही न पाहिलेली, पोट धरून हसायला लावणारी अफलातून कॉमेडी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.” रितेशने लिहिले की, “लवकरच एक कॉमेडी चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. त्यामुळे खळखळून हसण्यासाठी तयार राहा”. या सिनेमाची घोषणा जरी झाली असली, तरी सिनेमाच्या शुटिंगबद्दल आणि प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अजून अधिक माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा