हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात क्युट आणि गोड कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा. रितेश आणि जेनेलिया हे दोघं सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. या दोघांना इंडस्ट्रीमध्ये अनेक मित्र आहेत. आपल्या मित्रांना खुश कसे ठेवावे हे त्यांना योग्य माहित आहे. आत्ताच आपण नवीन महिना आणि नवीन आठवड्याची सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्याचा आणि सोबतच महिन्याचा भन्नाट शेवट रितेश आणि जेनेलिया यांनी त्यांच्या मित्रांसोबत केला आहे.
रितेश आणि जेनेलिया यांनी त्यांच्या चार मित्रांसोबत वीकएंडला जोरदार पार्टी केली आहे. याच पार्टीचा एक धमाल व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आशिष चौधरी, शमिता बंगारगी, शब्बीर अहलूवालिया, कांची कौल, रितेश आणि जेनेलिया या सहा जणांनी या पार्टीत जी काय धमाल केली आहे ती त्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसून येते. सैराटच्या झिंगाट गाण्यावर हे सहा जण वेड्यासारखा डान्स करत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला या गाण्यावर जेनेलिया, कांची, शमिता जोरदार नाचत आहे, तर त्यातच मध्ये रितेश आणि शब्बीर यांची एन्ट्री होते तर आशिष देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना आशिष आणि शमिता जमिनीवर देखील पडले. इतके गर्क होऊन ते नाचताना दिसत आहेत.
इंस्टाग्रामवर या पार्टीचा व्हिडिओ शेयर करताना जेनेलियाने लिहिले, ‘शनिवार रात्री मित्रांसोबत गुटर-गूइंग चालू आहे.’ या व्हिडिओला कांचीने रिप्लाय दिला ‘ओह माय गॉड!!! माझा विश्वासच बसत नाहीये की, आपण असे काही केले आहे.’
रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रितेश शेवटचा बागी ३ मध्ये दिसला होता. आगामी काळात तो ‘बच्चन पांडे’, ‘हाउसफुल ५’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’मध्ये दिसणार आहे.