Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी येणार एकत्र; बोल बोल राणी’ ७ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे सुमारे पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सिड विंचुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार, आशयपूर्ण चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रॉडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच न्यूझिलंड मोशन पिक्चर्सचे सिड विंचुरकर मराठी प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, ” मराठी चित्रपट आता जगभरात पोहोचत आहे. मुळात मराठी भाषेत उत्तमोत्तम विषय हाताळले जात असल्याने ते जगभरातील प्रेक्षकांना भावतात. मी स्वतः परदेशात असताना मराठी चित्रपट आवर्जून बघायचो. मुळात मराठी भाषेला समृद्ध साहित्याचा वारसा लाभला आहे.

त्यामुळे या चित्रपटांमध्ये वैविध्य जाणवते. चित्रपट निर्मिती करणे हे माझे पॅशन आहे आणि म्हणूनच मी भारतात आलो. मी माझा पहिला चित्रपट हा मराठीच करणार, हे ठरवलेच होते. लवकरच ‘बोल बोल राणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यात या चित्रपटात तीन मोठे कलाकार एकत्र झळकणार आहेत. मी खूप उत्सुक हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी.”

चित्रपटाबद्दल सई ताम्हणकर म्हणते, ‘’ माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या. परंतु खूप छान टीम एकत्र आल्याने आम्ही ही आव्हाने उत्तमरित्या पेलली. अपूर्वा आणि मी ‘दुनियादारी’पासून एकत्र आहोत आणि ती एक उत्तम एडिटर आहे.

हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे. तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी, असे मला वाटते. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय. भविष्यातही त्याच्यासोबत काम करेन, अशी आशा आहे. कारण मला त्याच्या कामाची पद्धत विशेष आवडली आहे. भूमिकेबद्दल, चित्रपटाबद्दल जास्त काही बोलणार नाही, परंतु माझा कस लागला होता.’’

सुबोध भावे म्हणतात, ‘’अपूर्वाचे निर्मिती क्षेत्रात आणि सिडचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. या दोघांनीही ज्या पद्धतीचा विषय निवडला आहे, तो अत्यंत धाडसी विषय आहे. गेली दोन-तीन वर्षं या चित्रपटावर काम सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टी खूप स्पष्ट होत्या आणि म्हणूनच चित्रीकरणात नेमकेपणा होता. अतिशय उत्तम व्यवस्थापन होते. मी चित्रपट पाहायला खूप उसुक आहे. मला आनंद आहे की, मी या चित्रपटाचा एक भाग आहे.’’

तसंच सिनेमाविषयी बोलताना चिन्मय मांडलेकर सांगतो ‘मी नुकतंच ‘बोल बोल राणी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलंय. बऱ्याच वर्षांनी सुबोध, सई आणि मी एकत्र काम केलं. आमची चांगलीच भट्टी जमली आहे. थोडा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. तर अपूर्वाला मी ओळखतो परंतु निर्माती म्हणून मी तिच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता.’’

‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच आता न्यूझिलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे आपल्या आणखी दोन चित्रपटांची लवकरच घोषणा करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना काहीतरी कमाल पाहायला मिळणार, हे नक्की !

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रणवीर सिंग करतोय डॉन ३ ची तयारी ? जिम मधील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

हे देखील वाचा