Friday, March 13, 2026
Home बॉलीवूड जेव्हा आजारी वाजिदला गुपचूप किडनी दान करून आली होती साजिदची पत्नी; संगीतकाराच्या आईने केला शोमध्ये खुलासा

जेव्हा आजारी वाजिदला गुपचूप किडनी दान करून आली होती साजिदची पत्नी; संगीतकाराच्या आईने केला शोमध्ये खुलासा

‘इंडियन प्रो म्युझिक लीग’ या गायन रिअॅलिटी शोच्या एका भागात दिवंगत संगीतकार वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली गेली. या खास प्रसंगी वाजिदचा भाऊ साजिद खानने एक धक्कादायक खुलासा केला, जो ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. या एपिसोडमध्ये साजिद-वाजिदची आई रजीना आणि साजिदची पत्नी लुबनासुद्धा विशेष पाहुणे म्हणून आल्या होत्या. शोमधील सहा संघांपैकी एका संघाचा कर्णधार साजिद आहे. कार्यक्रमादरम्यान साजिदच्या आईने सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा वाजिदला किडनीची तीव्र गरज होती. 2019 मध्ये त्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपण केले गेले. किडनी साजिदची पत्नी म्हणजेच वाजिदची मेव्हणी आणि माझी सून लुबना हिने दान केली होती.

साजिद-वाजिदची आई म्हणाली की, “मधुमेह असल्याने मला किडनी दान करता आली नाही. पण तरीही त्याला कुठुनतरी किडनी मिळेल अशी अपेक्षा होती. पण हळूहळू ही आशाही मोडली. आम्ही आमच्या सर्व नातेवाईकांना विचारले, तरी मदतीला कोणीही पुढे आले नाही. पण लुबनाने गुप्तपणे सर्व चाचण्या केल्या आणि त्याला किडनी दान केली. हल्ली कोणी आपल्या पालकांना देखील किडनी देत नाही. परंतु लुबनाने एकदाही विचार केला नाही आणि किडनी दान केली.”

 

रजीनाचे बोलणे ऐकून लुबना म्हणाली, “जेव्हा मला कळाले की, कुटुंबाशिवाय इतर लोक किडनी दान करू शकतात. तेव्हा मी कोणाला काही न विचारता, जाऊन सर्व चाचण्या केल्या. सर्व तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर, मी वाजिदला सांगितले की, मी प्रत्यारोपण करीन. हे ऐकून माझे पती साजिद बरेच अस्वस्थ झाले. मग मी त्यांना म्हणाले की, हा माझा निर्णय आहे. मग साजिदही माझ्याशी सहमत झाले.”

या दरम्यान, साजिद संपूर्ण घटना आठवून भावुक झालेला दिसत होता. तो म्हणाला की, “वाजिद 2 वर्षांपासून आजारी होता आणि आई त्याची काळजी घेत होती. किडनी दान करण्याच्या लुबनाच्या निर्णयामुळे मी आणि माझी मुले चिंताग्रस्त झालो होतो, परंतु तिने जे केले त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो. त्यावेळी आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्याकडे पैसे आणि उत्कृष्ट डॉक्टर होते, परंतु किडनीची व्यवस्था नव्हती.”

1 जून 2020 रोजी, वयाच्या 47 व्या वर्षी वाजिदचा हृदयविकाराच्या कारणामुळे मृत्यू झाला. साजिद-वाजिद चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली जोडी होती. या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी दिली. या जोडीने वांटेड, वीर, दबंग आणि राउडी राठोड या चित्रपटांत संगीत दिले आहे.

हे देखील वाचा