भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी या जगाचा निरोप घेतला. जवळपास ७ दशकं त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. ३६ भाषांमध्ये ३० हजारांपेक्षा अधिक गाणी गाणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दुःखातून अजूनही मनोरंजनविश्व बाहेर येऊ शकले नाही. प्रत्येक कलाकार लताजींना आठवत त्यांना आदरांजली व्यक्त करताना दिसत आहे. बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) याने देखील त्याच्या अनोख्या अंदाजाने लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओमध्ये तो लता मंगेशकर यांचे ऑल टाईम हिट असणारे ‘लग जा गले’ हे गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लताजींसारखे दुसरे कोणी नाही आणि कोणीही नसेल.’ सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे गाणे गात असताना सलमान काहीसा भावुक झाल्याचे देखील दिसत होते. काही तासांपूर्वीच शेअर केलेल्या या व्हिडिओवर तुफान लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. आता पर्यंत २६ लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला असून, असंख्य लोकांनी त्याला लाइक केले आहे.
सलमान खानने लता दीदींच्या निधनानंतर त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले होते की, “तुमची खूप आठवण येईल आमची नाइटिंगेल. तुमचा आवाज कायमच असेल. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.” तत्पूर्वी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या अंत्यसंस्काराला उपस्थित राहत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा