सलमान खान अभिनित चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई’ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. सलमानच्या चित्रपटात बॉडी डबलचा वापरही करण्यात आला आहे. सलमानच्या बॉडी डबल परवेझ काझीने सलमानसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सलमानशी बरेच साम्य असल्यामुळे परवेझ खूप प्रसिद्ध झाला आहे. त्याने अनेक चित्रपटांत सलमान खानच्या बॉडी डबलची भूमिका साकारली आहे. अलीकडेच परवेझने सोशल मीडियावर सलमानसोबत मॅचिंग ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे. परवेझच्या या फोटोंना सलमानच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परवेझ हा मुंबईतील मीरा रोडचा रहिवासी आहे. गेल्या सात वर्षांपासून तो सलमानसोबत काम करत आहे. परवेझचा पहिला चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ होता.
‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई’ चित्रपटाच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना परवेझ म्हणाला की, “ईश्वराच्या कृपेने राधेचे शूटिंग खूप चांगले झाले. खूप चांगले वाटते की, मी सलमान खानसोबत काम करतो आणि ते मला नेहमी संधी देतात. मी त्यांच्यासोबत काम करताना खूप एंजॉय करतो.”
पुढे तो म्हणाला की, “ईश्वराची ही मोठी कृपा आहे की, त्यांनी मला सलमान खानसारख्या व्यक्तीरेखेची झलक दिली. मी जिथे जातो, तिथे लोक मला प्रतिसाद देतात. मला दुरून बघून ते थोडे गोंधळतात. जेव्हा मी विमानतळ आणि सार्वजनिक ठिकाणी जातो, तेव्हा ते मला पुन्हा पुन्हा पाहतात. मला कधी कधी लाज वाटते की, ते खूप सुंदर आहेत आणि मी त्यांच्या सौंदर्याच्या दहा टक्केसुद्धा नाही. ते इतके मोठे सुपरस्टार आहेत, मी त्यांचे जितके कौतुक करेल, तितके कमी आहे.”
सलमानसोबतचा अनुभव शेअर करत परवेझ म्हणाला, “मी सलमानसोबत सात ते आठ वर्षांपासून काम करत आहे. ते मला पहिल्या दिवसापासूनच पसंत करत आहेत. कधीकधी आमच्यात मस्ती-विनोद देखील होतो. एकदा सर म्हणाले होते, “यार, परवेझ मला एक गोष्ट सांग. जेव्हा जेव्हा मी आरशात पाहतो तेव्हा मला वाटते की, तू माझ्यासारखा दिसतो की मी तुझ्यासारखा.” सरांनी बर्याच मुलाखतींमध्ये माझे उल्लेख करून, माझे कौतुकही केले आहे. हे त्यांचे मोठेपण आहे.”
तो पुढे म्हणाला, “सात-आठ वर्षांपूर्वी मी वांद्रे येथे छोटी नोकरी करायचो. हे ब्रँड मर्चेंडायझिंगचे काम होते. मला दररोज मीरा रोडहून ट्रेनमधून जावे लागत असे. मी १३ वर्षांचा असल्यापासून माझी कद-काठी सलमानसारखी होती, म्हणून लोक मला सल्लू भाई म्हणून संबोधत असे. पुढे देखील मी सलमान सरांसारखा दिसू लागलो. माझा फोटो पाहून को-ऑर्डीनेटरने मला बोलविले.”
“माझा पहिला चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ होता. आमची पहिली भेट खूप संस्मरणीय होती. मी तेव्हा खूप बालिश होतो. पहिल्याच दिवशी ते म्हणाले होते, “मुला, तू तुझ्या शरीराची काळजी घे. मी जिथे जाईल तिथे माझ्यासोबत चाल.” लोक लांब लांब उभे राहून सलमानच्या एका झलकची प्रतीक्षा करतात, अशामध्ये त्या व्यक्तीला देवाने माझ्या उपजीविकेचे साधन बनविले. मी त्यांच्या सोबत राहतो. मला वाटले नव्हते की, मी असे काहीतरी करेल. कामाच्या सुरूवातीस तर माझा विश्वासच बसत नव्हता की, मी या दिग्गजांमध्ये उभा आहे. सर जे खातात, ते मलाही खाऊ घालतात. हे सर्व काही परीकथेसारखे होते.”
परवेझ स्वत: सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये सलमान खानच्या बॉडी डबलची भूमिका साकारली आहे. यात ‘दबंग ३’, ‘भारत’, ‘रेस ३’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
सलमान खान आगामी प्रकल्पांविषयी बोलायचे झाले, तर तो चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये दिसणार आहे. यात तो त्याचा मेहुणा आयुष शर्माच्या अपोझिट असेल. तसेच या चित्रपटात सलमान एका सरदारच्या भूमिकेत असेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो










