आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात आता मोठे वळण आले आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एका साक्षीदाराने ८ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. साक्षीदाराने दावा केला आहे की, संपूर्ण प्रकरणात करोडो रुपयांचा व्यवहार झाला आहे. प्रभाकर राघोजी सेल असे या व्यक्तीचे नाव असून, तो २२ जुलै २०२१ पासून किरण गोसावीचा बॉडीगार्ड आहे. किरण गोसावी हा तोच व्यक्ती आहे, जो रेव्ह पार्टीत पकडलेल्या आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाताना दिसला होता. प्रभाकर राघोजी सेल या प्रकरणात पंचनामा करणाऱ्यांपैकी एक आहे.
पार्टीमध्ये किती वाजता आणि काय झाले?
प्रभाकरच्या वक्तव्यानुसार, २ ऑक्टोबर रोजी जेव्हा एनसीबीने रेव्ह पार्टीवर छापा टाकला, तेव्हा तो किरण गोसावी सोबत होता. प्रभाकर म्हणाला की, “गोसावींनी १०.३० वाजता बोर्डिंग एरियाला बोलावले, तेव्हा मी तिथे पोहोचलो, मी आर्यन खान आणि मुनमुन धमेचा यांना एका केबिनमध्ये पाहिले. यानंतर दुपारी १२.३० वाजता किरण गोसावी यांच्यासह एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून आर्यन खानला एनसीबी कार्यालयात आणले. रात्री १ वाजता किरण गोसावी यांनी मला एनसीबी कार्यालयात आत येण्यास सांगितले. ते म्हणाले की, मला या प्रकरणात साक्षीदार व्हायचे आहे.”
जबरदस्तीने केला पंचनामा
या निवेदनात प्रभाकर राघोजी सेल पुढे म्हणाला, “मी वरच्या मजल्यावर गेलो, तेव्हा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून सालेकरांनी १० कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या आणि माझ्याकडून माझ्या आधार कार्डचा तपशीलही घेतला.”
२५ कोटींचा सौदा
प्रभाकर राघोजी सेलने हे प्रकरण पुढे नेत सांगितले की, “थोड्या वेळाने किरण गोसावी यांना एनसीबी कार्यालयापासून ५०० मीटर अंतरावर सॅम डिसोझा नावाची व्यक्ती भेटली. मग गोसावी त्याच्या पांढऱ्या इनोव्हा कार मधून उतरला आणि त्याच्या मागे सॅम डिसुझाची गाडी आली. या दोन्ही कार लोअर परेल पुलाजवळ थांबल्या. आम्ही निघत असताना गोसावी सतत सॅम डिसोझाशी फोनवर बोलत होता. गोसावी म्हणाला की, तुम्ही २५ कोटींचा बॉम्ब लावला आहे, आता १८ कोटींना फायनल करा. समीर वानखेडे यांनाही आठ कोटी रुपये द्यायचे आहेत.”
पुजा ददलानीही गोसावीला भेटली
याप्रकरणी प्रभाकर राघोजी सेलने आणखी नावे घेतली आहेत. निवेदनात पुढे म्हणाला की, “थोड्या वेळाने निळ्या रंगाची मर्सिडीज कार आली जिथून पूजा दादलानी खाली उतरली. पूजा ददलानी, सॅम डिसूझा आणि गोसावी मर्सिडीज गाडीत बसले आणि बोलू लागले. पंधरा मिनिटांनी सगळे निघून गेले. यानंतर मी आणि गोसावी मंत्रालयात पोहोचलो. गोसावी कोणाशी तरी बोलत होते आणि मग वाशीला गेले. वाशी सोडल्यानंतर गोसावी पुन्हा ताडदेवला जाण्यास सांगतात आणि तेथून ५० लाख रुपये घेण्यास सांगितले. यानंतर, पांढऱ्या रंगाची कार क्रमांक ५१०२ तेथे आली, ज्यात पैशांनी भरलेल्या २ पिशव्या बाहेर आल्या. त्या पिशव्या मी वाशीला घेऊन गेलो आणि गोसावींना दिल्या.”
प्रभाकरच्या जीवाला आहे धोका
या निवेदनात प्रभाकर पुढे म्हणाला की, “दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गोसावी यांनी मला वाशीला बोलावले, पैशांनी भरलेली पिशवी दिली आणि सॅम डिसोझाला देण्यास सांगितले. संध्याकाळी ६.१५ वाजता सॅम डिसूझाने मला हॉटेल ट्रायडंटला बोलावले जेथे मी पैशांनी भरलेल्या पिशव्या घेऊन त्याला दिल्या. किरण गोसावी आता बेपत्ता असून एनसीबीचे लोक यात सामील आहेत, त्यांनी मला मारून टाकू नये किंवा मला गायब करू नये, अशी भीती वाटते.” आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणी अनेक खुलासे होत आहेत. याप्रकरणी चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडेची देखील चौकशी करण्यात आली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आर्यन खान प्रकरणावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘संपूर्ण इंडस्ट्रीने मिळून कचरा…’
-‘तो मोठ्या नेटवर्कचा भाग…’, आर्यनचा जामीन अर्ज फेटाळत न्यायाधीशांचे मोठे वक्तव्य