Tuesday, July 9, 2024

‘राजा’ सिनेमाला २६ वर्षे पूर्ण, संजय कपूरने व्हिडिओ शेअर करत सांगितला माधुरी दीक्षितसोबत काम करण्याचा अनुभव

हिंदी सिनेसृष्टीमधे असे अनेक सिनेमे आहेत, जे कलाकारांच्या किंबहुना संपूर्ण सिनेमाच्या टीमच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरले आहेत. अभिनेते संजय कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या करिअमधला असाच एक महत्वाचा सिनेमा आहे ‘राजा.’ १९९५ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. सिनेमाची कथा, अभिनय, कलाकार यांच्यासोबतच या चित्रपटातील गाणी देखील तुफान गाजली. काही सिनेमे त्यांच्या यशामुळे कलाकारांच्या कायम लक्षात राहतात. अशा सिनेमांना अनेक वर्ष झाली तरी त्याच्या आठवणी मात्र कायम चिरतरुण असतात.

या सिनेमाने २६ वर्ष पूर्ण केले आहे. या निमित्ताने अभिनेते संजय कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सिनेमातील गाण्याच्या शूटिंगची एक आठवण फॅन्सला सांगितली आहे. सोबतच या सिनेमातील ‘जरा फिर से केहना’ या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे.

त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या गाण्याच्या शूटिंगने सिनेमाची शूटिंग सुरू झाली होती. आम्ही या गाण्याची शूटिंग उटी मध्ये करत होतो. मी खूप नर्व्हस होतो. मी माधुरीला धन्यवाद म्हणू इच्छितो की, तिने मला सेटवर खूपच सहज आणि सामान्य वातावरणाची जाणीव करून दिली. या सिनेमाच्या निमित्ताने मी एक सुपर सुपर सुपर स्टारसोबत काम करत होतो. मात्र, तिच्यासोबत काम करताना तिने मला कधीच असे भासवले नाही की ती खूप मोठी स्टार आहे. अतिशय सामान्य पद्धतीने ती सर्वांसोबत वागायची. या सिनेमाची आमची टीम खूपच कमाल होती.”

बोनी कपूर, अनिल कपूर या दोघांचा लहान भाऊ म्हणून संजय कपूर ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठे आणि यशस्वी सिनेमे केले. मात्र, त्यांना त्यांच्या भावांसारखे मोठे यश मिळवता आले नाही. मागच्या काही वर्षांपूर्वी संजय कपूर यांनी टेलिव्हिजनवर देखील ‘दिल संभल जा जरा’ मालिकेतून पदार्पण केले होते. आता संजय लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा