मल्याळम सिनेमाला यंदा ख्रिसमसच्या मुहूर्तावर एक मोठी ब्लॉकबस्टर मिळाला आहे. ‘सर्वम माया’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत विक्रमी कमाई करत जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, अभिनेता निविन पॉली (Nivin Pauly)यांच्या करिअरमधील पहिली 100 कोटी क्लबमध्ये सामील होणारी फिल्म ठरली आहे.
अखिल सत्यन दिग्दर्शित ‘सर्वम माया’ला प्रदर्शनानंतर उत्तम वर्ड ऑफ माउथ मिळाले. सणासुदीच्या सुट्टीचा मोठा फायदा चित्रपटाला झाला आणि सलग 11 दिवस तो सिनेमागृहांमध्ये जोरदार चालताना दिसत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 8.25 कोटींची शानदार ओपनिंग घेतली आणि चार दिवसांतच 45.25 कोटी कमावले. पहिल्या आठवड्यानंतरही कमाईचा वेग कायम राहिला.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने आठ दिवसांत जगभरात 78.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या आठवड्यातही ‘सर्वम माया’ने आपली पकड मजबूत ठेवत दुसऱ्या शुक्रवारी आणि शनिवारी प्रत्येकी 11 कोटी कमावले. दहाव्या दिवशी अंदाजे 12 कोटींची कमाई करत चित्रपटाचा एकूण वर्ल्डवाइड ग्रॉस 101.85 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
विशेष बाब म्हणजे, फक्त 8 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार करत निर्मात्यांना मोठा नफा मिळवून दिला आहे. केवळ केरळमध्येच चित्रपटाने 10 दिवसांत 45 कोटींची कमाई केली असून, लवकरच हा आकडा 50 कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज ट्रेड तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
‘सर्वम माया’ ही एक फॅमिली-फ्रेंडली हॉरर-कॉमेडी फिल्म असून, सुपरनॅचरल घटक, हलका-फुलका विनोद आणि भावनिक कथा यांचा उत्तम मिलाफ प्रेक्षकांना भावला आहे. 15 वर्षांच्या करिअरनंतर निविन पॉलीला मिळालेला हा मोठा यशाचा टप्पा त्यांच्या कारकिर्दीसाठी मैलाचा दगड ठरत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पहिल्या आठवड्यात ‘इक्कीस’ची बॉक्स ऑफिस वाटचाल कशी राहिली? सुट्टीचा मिळाला फायदा










