टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) अभिनेता विभू राघवेच्या (Vibhu Raghve) कर्करोगाच्या उपचारासाठी निधी गोळा करत आहे. सौम्या टंडनने इंस्टाग्रामवर विभू राघवेसोबतचा एक फोटो शेअर केला आणि ते या अभिनेत्याला कशी मदत करू शकतात हे लोकांसोबत शेअर केले. तसेच तिने यासाठी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. अभिनेता विभूला शेवटच्या स्टेजचा कोलन कॅन्सर आहे. फेब्रुवारीमध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर करून लोकांना याची माहिती दिली होती. ही दुःखद बाब सांगताना तो भावूकही झाला होता. विभू राघवे ‘निशा और उसके कजिन्स’ या मालिकेत झळकला होता.
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून अभिनेत्री सौम्या टंडन सर्वत्र लोकप्रिय झाली होती. सध्या सौम्याची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. यावरुन तिने अभिनेता विभू राघवेच्या कॅंसर रोगाबद्दल निधी गोळा करत सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सौम्या टंडनने लिहिले, “माझ्या प्रिय विभूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याचे तेजस्वी हास्य आपल्या जीवनाला शांती देते. तो सध्या वेगाने पसरणाऱ्या कोलन कॅन्सरशी झुंज देत आहे जो शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांच्यावर मुंबईतील टाटा मेमोरिअम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची सकारात्मकता आणि धैर्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्ही शक्य आहे ते करत आहोत. त्याच्यासाठी आम्ही निधीही उभारत आहोत. तुमची इच्छा असल्यास तुम्हीही त्यांना मदत करू शकता.”
दरम्यान अभिनेता विभू राघवेने सोशल मीडियावरुन त्याच्या या आजाराबद्दल लोकांना सांगितले होते. विभू राघवेने फेब्रुवारीमध्ये व्हिडिओ शेअर केला होता आणि सांगितले होते की “तो काही दिवसांपासून सतत आजारी आहे. सर्व चाचण्या करून घेतल्यावर असे आढळून आले की त्याला शेवटच्या टप्प्यातील कोलन कॅन्सर आहे. या बातमीने एका दिवसात त्याच्या आयुष्यातील रंगच बदलला आहे . मोहित मलिक, त्याची पत्नी अदिती यांच्यासह त्याच्या मित्रांना कॅन्सर झाल्याचे आधीच कळले होते. यासोबतच त्याची मैत्रिण सौम्या टंडननेही त्याला प्रत्येक क्षणी साथ दिली होती. ”
याबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला होता की, “एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यावर त्याचे रिपोर्ट पाठवले जातात आणि पुढे काय करायचे ते त्याचे मित्र ठरवतात. पहिल्या दिवसापासून मला डॉक्टरांकडे अपॉईंटमेंट घ्यावी लागली नाही, की मला डॉक्टरकडे जावे लागले नाही. मला काही करण्याची गरज नव्हती.” आता सौम्या टंडननेही लोकांना विभू राघवला मदत करण्याचे आवाहन केले आहे. सध्या सौम्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. तसेच तिच्या या कामाचे कौतुकही केले जात आहे.
हेही वाचा