Monday, July 1, 2024

दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष अडकली लग्न बंधनात; अजय देवगणच्या ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

कन्नडमधील ‘पोर्की’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री म्हणजेच प्रणिता सुभाष. आज ती नुकतेच लग्न बंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने रविवारी (दि. 30 मे) रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि व्यावसायिक नितीन राजूसोबत लग्न केले आहे. या लग्नात प्रणिता आणि नितीनच्या कुटुंबातील काही लोक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर चालली होती.

माध्यमांतील वृत्तानुसार, प्रणिता आणि नितीनला त्यांचे लग्न धूम धडाक्यात करायचे होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. देशात चालू असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेत त्या दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले आहे.

प्रणिता आणि नितीनने त्यांच्या लग्नाबाबत माहिती देताना सांगितले की, “आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्ही ३० मेला लग्न केले आहे. पण आम्हाला या गोष्टीचे खूप वाईट वाटत आहे की, आम्ही आमच्या लग्नाची तारीख सांगू शकलो नाही. कोरोना महामारिमुळे लग्नाच्या आधीच्या दिवशी पण आमचे ठरले नव्हते की, आम्ही उद्या लग्न करणार आहोत. आम्हाला अनेक लोकांना बोलवायचे होते, पण आम्ही तसे नाही करू शकलो.”

प्रणिताने तिच्या कारकिर्दीची सुरुवात कन्नड सुपरस्टार दर्शन सोबत, २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पोर्की’ या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट तेलुगू सुपरस्टार महेश बाबू याच्या ‘पोकरी’ या चित्रपटाचा कन्नड रिमेक होता. हाच चित्रपट बॉलिवूडमध्ये ‘वॉंटेड’ या नावाने बनवला होता. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता.

प्रणिताला तमिळ चित्रपट ‘सागुनी’ साठी ओळखले जाते. या चित्रपटात कार्ती हा तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. या सोबतच ती पवन कल्याण आणि समंथा अक्किनेनी यांच्यासोबत ‘अत्तारिंतिकी दारेदी’ या चित्रपटात दिसली होती.

प्रणिता सुभाष ही लवकरच अजय देवगण आणि संजय दत्त यांच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सोबतच ती प्रियदर्शन याच्या ‘हंगामा २’ या चित्रपटात जावेद जाफरी यांचा मुलगा मिजानसोबत दिसणार आहे. या चित्रपटात परेश रावल आणि शिल्पा शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हे देखील वाचा