Friday, July 5, 2024

‘जवळ ये लाजू नको’, म्हणत मराठमोळ्या शरद केळकरने केला बायकोसोबतचा फोटो शेअर

मनोरंजनसृष्टीमध्ये अनेक जोड्या आहेत. या क्षेत्रात वावरताना बऱ्याचदा आपल्याला जाणवते की, इथे रोज नवीन जोड्या तयार होतात आणि रोज जुन्या जोड्या तुटतात. असे असूनही या क्षेत्रातील काही जोड्यांकडे पाहून ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ या वाक्यावर आणि लग्न संस्थेवर सर्वांचाच विश्वास बसतो. या ग्लॅमर जगात आपले प्रेम टिकवणारे कलाकार खूप कमी पाहायला मिळतात. यातलीच एक जोडी म्हणजे मराठमोळा अभिनेता शरद केळकर आणि त्याची पत्नी कीर्ती गायकवाड यांची होय.

मागच्या काही काळापासून शरद खूपच प्रकाशझोतात आला आहे. टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या शरदने मोठ्या संघर्षाने आणि मेहनतीने या मनोरंजन विश्वात त्याचे स्थान बळकट केले आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या शरदचे व्यायसायिक आयुष्य तर सर्वांनाच माहित आहे. अनेक वर्षांपासून या क्षेत्रात असणाऱ्या शरदला त्याच्या आवाजाने आणि अभिनयाने एक हक्काची ओळख मिळवून दिली.

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या शरदने नुकताच त्याचा त्याची बायको कीर्तीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अतिशय सुंदर, हटके आणि रोमॅंटिक असलेल्या या फोटोला शरदने कॅप्शन देखील हटकेच दिले आहे.

हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, “जवळ ये लाजू नको.’ सोबतच दोन हार्टचे ईमोजी देखील पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये शरद आणि कीर्ती हटके एक्सप्रेशन देत एकमेकांच्या मिठीत दिसत आहे. या दोघांचा हा फोटो इंटरनेटवर चांगला व्हायरल होत असून, फॅन्स आणि कलाकारांच्या एक से बढकर एक कमेंट्स यावर येत आहेत.

शरद आणि कीर्ती यांची जोडी फॅन्समध्ये खूप लोकप्रिय आहे. या दोघांच्या जोडी इतकीच सुंदर त्यांची लव्हस्टोरी आहे. शरद आणि कीर्तीने अनेक मालिकांमध्ये सोबत काम केले. दूरदर्शनवरील ‘आक्रोश’ मालिकेदरम्यान यांची पहिल्यांदा भेट आणि ओळख झाली. त्यानंतर सी.आय.डी. मालिका करताना त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून या दोघांनी २००५ साली लग्न केले.

दोघेही महाराष्ट्रीयन असल्याने त्यांच्या लग्नाला घरातून कोणताही विरोध झाला नाही. शरद केळकर आणि कीर्ती गायकवाडचे लग्न ३ जून, २००५ साली महाराष्ट्रीयन पद्धतीने झाले. नुकतेच या दोघांच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण झाले आहेत. आजही त्यांच्यातले प्रेम अगदी तरुण आहे. या दोघांना सहा वर्षांची मुलगी असून तिचे नाव केशा आहे.

कीर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. कीर्तीने ‘सात फेरे’, ‘छोटी बहू’, ‘ससूराल सिमर का’ या मालिकेत काम केले आहे. दुसरीकडे शरद केळकरने मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकेत विविध भूमिका केल्या आहेत.

‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद झळकला होता. त्यानंतर त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटात तृतीयपंथियाची भूमिका केली होती. लवकरच तो अजय देवगणच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ सिनेमात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा