मराठी मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक सध्या खूपच चर्चेत आहे. २०२१ हे नवीन वर्ष शशांकसाठी खूपच आनंदायी ठरत आहे. नुकताच शशांक केतकर बाबा झाला आणि आता त्याची नवीन मालिका येत असून, या मालिकेत तो करियरमधली पहिली नकारात्मक भूमिका साकारणार आहे.
‘होणार सून मी या घरची’ आणि ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत त्याने एका आदर्श मुलाची आणि नवऱ्याची भूमिका साकारली. आता शशांक ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत दिसणार आहे. त्याच्या या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तो पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो समरप्रताप नावाची मोठ्या उद्योगपतीची भूमिका निभावताना दिसणार आहे. ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत शशांकसोबतचा अभिनेत्री तन्वी मुंडेल आणि आशय कुलकर्णीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
शशांक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे, अनेकदा तो त्याच्या पोस्टमुळे चर्चेत देखील येत असतो. नुकतीच त्याने त्याच्या नवीन मालिकेसंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेचा प्रोमो शेयर करत लिहिले, ” I think शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे मला. एक अभिनेता म्हणून television वर फार कमी वेळा असे experiments करायला मिळतात.” असे लिहीत त्याने महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांचे आभार मानले आहेत.
शशांकला माहित आहे नकारात्मक भूमिकांना प्रेक्षक खूप शिव्या देतात, म्हणूनच त्याने अशी पोस्ट शेयर केली आहे. आता शशांकला नकारात्मक भूमिकेत पहिल्यांदाच बघण्यासाठी सर्वच जणं प्रचंड उत्सुक आहे. या भूमिकेतूनही शशांक त्याच्या प्रभावी अभिनयाने रसिकांच्या मने जिंकणार हे नक्की.