Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड 8 वर्षांनंतरही शशी कपूर कायम स्मरणात; जाणून घ्या त्यांच्या कारकीर्दीचे खास टप्पे

8 वर्षांनंतरही शशी कपूर कायम स्मरणात; जाणून घ्या त्यांच्या कारकीर्दीचे खास टप्पे

आज बॉलिवूडमधील दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor)यांची 8 वी पुण्यतिथी आहे. 4 डिसेंबर 2017 रोजी दीर्घ आजाराशी झुंज देत त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांच्या समृद्ध आणि बहुआयामी कथा पुन्हा एकदा जाणून घेऊया.

शशी कपूर हे त्यांच्या काळातले लोकप्रिय सुपरस्टार म्हणून ओळखले जात. देखणा चेहरा, सहजसुंदर अभिनय आणि प्रभावी संवादफेक यामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. केवळ व्यावसायिक चित्रपट नव्हे, तर समांतर आणि आंतरराष्ट्रीय सिनेमातही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता देशातच नव्हे तर परदेशातही होती. त्यांच्या निधनानंतरही त्यांचे संवाद, गाणी आणि चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत.

शशी कपूर यांनी अत्यंत लहान वयात अभिनयाची सुरुवात केली. दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे ते धाकटे सुपुत्र.  पृथ्वीराज कपूर यांच्या दिग्दर्शित आणि निर्मित नाटकांमध्ये काम केले आणि नंतर 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात ‘शशीराज’ या नावाने बालकलाकार म्हणून पदार्पण केले. आग (1948) आणि आवारा (1951) या चित्रपटांमधील त्यांच्या बाल कलाकाराच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत, जिथे त्यांनी त्यांचे मोठे भाऊ राज कपूर यांनी साकारलेल्या पात्रांच्या लहान आवृत्त्या साकारल्या.

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर 2015 मध्ये त्यांना 2014 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्या नंतर हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे ते कपूर घराण्यातील तिसरे व्यक्तिमत्त्व ठरले.

अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही शशी कपूर यांच्या कारकीर्दीत एक काळ असा आला की त्यांना काम कमी मिळू लागले. आर्थिक अडचणी वाढू लागल्या. त्या काळात त्यांनी आपली आवडती स्पोर्ट्स कार विकली, तर पत्नी जेनिफर हिलाही काही वस्तू विकाव्या लागल्या. त्यांच्या मुलाने, कुणाल कपूर, एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता हा संघर्षाचा काळ मागे टाकत 70 च्या दशकात शशी कपूर पुन्हा तेजाने उदयास आले. त्यांचे चित्रपट एका मागोमाग हिट ठरू लागले आणि त्यांचा स्टारडम पुन्हा प्रस्थापित झाला. आजही त्यांचा प्रचंड चाहता वर्ग कायम आहे. शशी कपूर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेला ठेवा आजही तितकाच प्रेरणादायी आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

बिग बॉस फेम योगिता चव्हाणचा बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल; एकदा पाहाच

 

हे देखील वाचा